‘एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी शंभर कोटी देण्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन : बागुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:44+5:302021-02-15T04:10:44+5:30
पुणे : ‘एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी ‘सीआरएफ’ फंडातून १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिले ...
पुणे : ‘एचसीएमटीआर’ रस्त्यासाठी ‘सीआरएफ’ फंडातून १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असून, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबत लवकर निवेदन सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी दिली.
गडकरी हे चांदणी चौक येथील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले असताना, या प्रसंगी बागुल यांनी त्यांची भेट घेऊन एचसीएमटीआर रस्ता पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याबाबत चर्चा केली. तेव्हा गडकरी यांनी सीआरएफ'' फंडातून १०० कोटी रुपये देऊ, असे सांगून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले.
एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार असल्याची माहिती बागुल यांनी या वेळी गडकरी यांना दिली.
-----