पुण्यात जलवाहतूक सुरू होणार, नितीन गडकरी यांनीच प्रस्ताव मागविला - गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:42 AM2017-09-16T03:42:36+5:302017-09-16T03:42:43+5:30
पुण्याच्या मुठेतून जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असून पाटबंधारे विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयत्नाला लवकरच कागदोपत्री सविस्तर प्रस्तावाचे स्वरूप दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे : पुण्याच्या मुठेतून जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असून पाटबंधारे विभागाने त्याची तयारी सुरू केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असलेल्या या प्रयत्नाला लवकरच कागदोपत्री सविस्तर प्रस्तावाचे स्वरूप दिले जाईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी जलवाहतुकीच्या विषयावर चर्चा झाली होती. पालकमंत्री बापट यांनी त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. खासदार अनिल शिरोळे यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट झाल्यावर त्यांच्याशी यावर चर्चा केली. त्यांनी यासाठीचा प्रस्ताव पाठवावा, असे सांगितल्यावर खासदार शिरोळे यांनी तसे बापट यांना कळवले. बापट यांनी पाटंबधारे विभाग व अन्य काही सरकारी कार्यालयांबरोबर चर्चा करून याची सविस्तर माहिती मागवली आहे.
प्रस्ताव तयार झाल्यानंतर राज्य सरकारच्या संमतीने तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, स्वत: गडकरी यात रस घेत आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत पाहता तेच याला अंतिम स्वरूपही देऊ शकतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.
मुठेबरोबर पवनेतूनही जलवाहतूक शक्य
मुठेतून अशा प्रकारे जलवाहतूक सुरू करता येणे शक्य आहे. तसेच पुढे ती पवना नदीत पिंपरी-चिंचवडमध्येही सुरू करता येईल. त्यासाठी नदीचे पाणी स्थिर ठेवणे, किती पाणी लागेल. वाहतुकीच्या बोटींसाठी लागणारे चॅनेल कसे तयार करता येतील, अशा अनेक तांत्रिक गोष्टी यामध्ये आहेत.
संबंधितांना त्याचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. प्रामुख्याने पाणी किती लागेल, असा प्रश्न आहे. तसेच थांबे कुठे करायचे, त्याला जोडरस्ते कसे तयार करायचे, अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत. विविध खात्यांचा सहभाग त्यात लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती बापट यांनी दिली.