सिरो सर्व्हेकरिता ‘एनआयव्ही’ने महापालिकेकडे मागितले ४५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:55+5:302021-07-30T04:11:55+5:30
पुणे : पुणे शहरातील दहा हजार बालकांचा सिरो सर्व्हे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजी अर्थात ...
पुणे : पुणे शहरातील दहा हजार बालकांचा सिरो सर्व्हे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरोलॉजी अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने’ (एनआयव्ही) पुणे महापालिकेकडे ४५ लाख रुपयांचा निधी मागितला आहे़ तसे पत्र त्यांनी महापालिकेला पाठविले असून, टेस्टिंग किट, स्टेशनरी, वाहन प्रवासखर्च याकरिता या निधीची मागणी करण्यात आली आहे़
दरम्यान, एनआयव्हीने पत्राद्वारे केलेली ही मागणी अद्याप मंजूर झालेली नसून, अद्याप हा निधी देण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही़
शहरातील ६ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक अँटीबॉडी (प्रतिपिंडे) किती प्रमाणात विकसित झाली आहे, याच्या तपासणीसाठी एनआयव्ही व पुणे महापालिकेच्या वतीने सिरो सर्व्हेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ मात्र या सर्व्हेकरिता महापालिकेनेच ४५ लाख रुपये महापालिकेने द्यावेत, असे पत्र एनआयव्हीने महापालिकेच्या आरोग्य विभागालाच दिले आहे़
सदर सिरो सर्व्हेमध्ये शहरातील बालकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक किती अँटीबॉडी तयार झाल्या, तसेच किती प्रमाणात प्रतिकारशक्ती तयार झाली याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापलिकेच्या हद्दीतील १० हजार बालकांचे नमुने घेऊन ती चाचणी करण्यात येणार असली तरी, या सिरो सर्व्हेमध्ये सहभागी होणाऱ्या बालकांच्या पालकांची संमती घेतली जाणार आहे. दरम्यान, या सर्व्हेसाठी लागणारे मनुष्यबळ हे महापालिकेने पुरवायचे असून, त्यासाठी लागणारे टेस्टिंग किट, स्टेशनरी, वाहनांचा प्रवास आदी कामांसाठी लागणारा खर्च हा महापालिकेने करावा, असे यामध्ये म्हटलेले आहे.
--------
चौकट :-
असा होणार सिरो सर्व्हे
शहरातील सदनिका, गृहनिर्माण संस्था व झोपडपट्टी अशा तीन स्तरांत रहिवास असलेल्या बालकांकडून चाचणीसाठी नमुने घेतले जाणार आहेत़ याकरिता महापालिकेचे २०० समूह (क्लस्टर) घेतले जाणार असून, प्रत्येकी क्लस्टरमधून ५० नमुने घेण्यात येणार आहेत़ यात ३५ क्लस्टर झोपडपट्टी, सदनिकामधील ३५ व १२० क्लस्टर गृहनिर्माण सोसायट्यांमधे राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे़
----------------