पार्किंगसाठी महापालिकेचीच मनमानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:09 AM2018-08-24T05:09:13+5:302018-08-24T05:09:32+5:30

नाट्यगृहांमध्ये अवाजवी शुल्क; सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आलेल्यांना बसतोय भुर्दंड

NMC's arbitrariness for parking | पार्किंगसाठी महापालिकेचीच मनमानी

पार्किंगसाठी महापालिकेचीच मनमानी

Next

पुणे : मल्टिप्लेक्समध्ये तीन तासांकरिता १० रुपयांपेक्षा अधिक पार्किंग शुल्क आकारण्यावर आक्षेप घेतल्यानंतर आता महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृहामध्येही पार्किंग शुल्काबाबतच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. दुचाकींसाठी ५ रुपये आणि चारचाकींसाठी १० रुपये अशी सर्वसाधारणपणे शुल्कनिश्चिती केलेली असतानाही बालगंधर्व रंगमंदिराच्या नाट्यगृहाच्या पार्किंगसाठी ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारून पुणेकरांची लूट सुरू आहे.
खासगी वाहनांचा वाढलेला वापर, शहराच्या विविध भागांतील अरुंद रस्ते अशा गोष्टींमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यात जी नाट्यगृहं आहेत, त्यांतील काही महापालिकेची आहेत. नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या दुचाकी किंवा चारचाकीधारकांना पार्किंगसाठी भटकावे लागू नये, या विचारातून महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी दोन नाट्यगृहांमधील ठेकेदारांकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पार्किंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने दुचाकी वाहनांसाठी आणि चारचाकी तसेच इतर वाहनांसाठी किती शुल्क आकारावे, याचा स्पष्ट करार करून त्यानंतरच पार्किंगचे ठेके ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले जातात. पालिकेने पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या शुल्काइतकीच रक्कम आकारावी, असे बंधनकारक असताना ठेकेदारांकडून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाप्रमाणे पार्किंगचे पैसे वसूल करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णा भाऊ साठे नाट्यगृहातील पार्किंगसाठी नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे एका तासासाठी ५ रुपये आणि तीन तासांसाठी १० रुपये शुल्क घेतले जाते. काही भागात पार्किंगचे तास वाढले, की तासाप्रमाणे शुल्क आकारले जाते, असे सांगण्यात येते. त्यानुसार एका तासानंतर दोन तास जास्त झाल्यास ७ रुपये शुल्क होणे अपेक्षित आहे; मात्र एकदम तीन तासांसाठी १० रुपये शुल्क आकारले जाणे योग्य आहे का? हीच परिस्थिती अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचीदेखील आहे. दुचाकीसाठी तीन तासांकरिता १० रुपये, तर चारचाकीसाठी २० रुपये शुल्काची अवास्तव आकारणी केली जात असल्याचे समोर आले आहे. एक दुचाकी पार्क करण्याव्यतिरिक्त नागरिकांना पार्किंगसाठी कोणत्याही अतिरिक्त सोयीसुविधा मिळत नसतानाही १० रुपये कशासाठी मोजायचे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. ठेकेदारांकडून पावती दिली जाते; मात्र तीवर तासांचा उल्लेख करून पैसे घेतले जातात. या संदर्भात महापालिका नाट्यगृह व्यवस्थापक सदाशिव लायगुडे यांना विचारले असता, महापालिकेच्या नाट्यगृहांमधील दुचाकी पार्किंगसाठी ५ रुपये आणि चारचाकीसाठी १० रुपये आकारणी नियमावलीमध्ये समाविष्ट आहे. ठेकेदारांनी किती शुल्क आकारायचे, हे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून ठरविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग वर्षापासून बंद
पार्किंगसाठी पैसे ठेवायचे की ते सर्वांसाठी विनामूल्य खुले करायचे, यावर अनेकदा चर्चा आणि बैठका झाल्यानंतरही स्थलांतर झालेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीतील पार्किंग एक वर्ष उलटल्यानंतरही बंद आहे.
गेल्या वर्षी १२ आॅगस्टला या इमारतीचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून न्यायाधीश व कर्मचारी वगळता सर्वांसाठी येथील दुमजली पार्किंग बंद आहे.
पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील, पक्षकार जिल्हा न्यायालयात गाडी लावत आहे. त्यामुळे तेथे वाहनांची गर्दी वाढत आहे.
कौटुंबिक न्यायालयात पे अँड पार्क केल्याने तिकडची वाहनेदेखील जिल्हा न्यायालयात पार्क करण्यात येतील. त्यामुळे कोंडी कमी करण्याचा उद्देश पे अँड पार्कमधून साध्य होणार नाही, असे मत काही वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केले आहे.

बालगंधर्व नाट्यगृहात किती वेळ कार्यक्रमाला आला आहात, अशी विचारणा करण्यात आली. कार्यक्रमाला आले आहे, असे म्हटल्यावर ‘१० रुपये काढा.’ मी म्हटले, १० रुपये जास्त आहेत, तर ‘आता दर वाढले आहेत.’ मी याबाबत सविस्तर विचारले असता, ‘एका तासासाठी ५ रुपये आणि तीन तासांसाठी १० रुपये,’ असे शुल्क ठरले असल्याचे सांगण्यात आले.
- तक्रारदार

अधिक पैसे घेतल्यास कारवाई
महापालिकेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर व अण्णा भाऊ साठे सभागृह येथे पार्किंगच्या कामाचा ठेका खासगी व्यक्तींना दिला आहे. हा ठेका देताना पार्किंगचे दर निश्चित केलेले असून, दुचाकीसाठी ५ रुपये आणि चारचाकी वाहनासाठी १० रुपये, असे दर निश्चित केले आहेत. परंतु, यापेक्षा अधिक पैसे घेतले जात असतील, तर चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
- अनिल मुळे
मालमत्ता व व्यवस्थापन विभागप्रमुख

Web Title: NMC's arbitrariness for parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.