गणेश विसर्जन फिरत्या हौदावर महापालिकेचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:41+5:302021-09-16T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात पर्यावरणपूरक अनुकूल गणेश विसर्जनाकरिता, महापालिकेने अकरा दिवसांसाठी ६० फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात पर्यावरणपूरक अनुकूल गणेश विसर्जनाकरिता, महापालिकेने अकरा दिवसांसाठी ६० फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे़ मात्र, हे फिरते हौद नक्की कुठे-कुठे फिरतात, किती काम करतात़, त्यानुसारच त्यांना त्याचे शुल्क अदा केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़ तसेच, याबाबत देखरेख ठेवण्याचे आदेश प्रशासनाला स्थायी समितीकडून देण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
शहरात पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महापालिकेने ६० फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे़ मात्र, पहिल्या दिवशी म्हणजे एक दिवसाच्या तसेच अर्ध्या दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी हे हौद कोठेच उपलब्ध झाले नाहीत. याबाबत ‘लोकमत’ने दुसऱ्या दिवशीच ही वस्तुस्थिती मांडली होती़ दुसऱ्या दिवशीही हे फिरते हौद महापालिकेच्या प्रसिध्दीचे फलक गाड्यांवर न झळकल्याने आहे त्याच जागी उभे होते़ त्यामुळे हे फिरते हौद सर्व स्तरातून टीकेचे धनी ठरले होते.
दरम्यान, या विनानिविदा प्रकियेचा विषय मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी आला़ त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या नंदा लोणकर यांनी त्यास विरोध केला़ मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून व पर्यावरणपूरक अनुकूल गणेश विसर्जनकरिता याला विरोध करू नये, अशी भूमिका हेमंत रासने यांनी मांडली़ त्यामुळे या विनानिविदा मान्य झालेल्या सुमारे १ कोटी २६ लाख रुपये या फिरत्या हौदांवर खर्च विषयात महापालिकेने शुल्क अदा करताना, फिरते हौद नक्की कुठे-कुठे फिरतात, किती काम करतात त्यानुसारच त्यांना त्याचे शुल्क अदा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.