एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर; शिष्यवृत्तीचा कोटा ११ हजार ६८२ विद्यार्थी एवढा निश्चित
By प्रशांत बिडवे | Published: April 14, 2024 05:27 PM2024-04-14T17:27:36+5:302024-04-14T17:28:21+5:30
राज्यातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (एनएमएमएस २०२३-२४ ) शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मागील दाेन महिन्यापासून परीक्षार्थी विद्यार्थी, पालक निवड यादीची प्रतिक्षा करीत हाेते. शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी एनएमएमएस शिष्यवृत्तीचा कोटा ११ हजार ६८२ विद्यार्थी एवढा निश्चित केला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे आयाेजन केले हाेते. विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दि. ७ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १६ फेब्रुवारी पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांनी पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यासाठी ११ हजार ६८२ शिष्यवृत्ती कोटा निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४ % आरक्षण समाविष्ट केलेले आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत करण्यात येते.
या संकेतस्थळावर पाहता येईल निवड यादी
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची निवड तसेच गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर शुक्रवार दि. १२ पासून पाहता येणार आहे. परीक्षेचा निकाल व निवड यादी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. शाळांनी व विद्यार्थ्यांनी हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुन काढून घ्यावयाचा आहे.