दिवाळीपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:15 AM2021-09-15T04:15:09+5:302021-09-15T04:15:09+5:30
पुणे : कोरोना टाळेबंदीमध्ये प्रचंड आर्थिक नुकसान सहन केलेल्या फेरीवाल्यांचा आता कुठे व्यवसाय होत आहे, त्यांच्या उत्पन्नावर घाला घालू ...
पुणे : कोरोना टाळेबंदीमध्ये प्रचंड आर्थिक नुकसान सहन केलेल्या फेरीवाल्यांचा आता कुठे व्यवसाय होत आहे, त्यांच्या उत्पन्नावर घाला घालू नये, या पथारी व्यावसायिक पंचायतीने केलेल्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी दिली.
संघटनेच्यावतीने या व अन्य काही मागण्यांसाठी महापालिका मुख्य इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली. त्यापूर्वी काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून शहरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू होती. संघटनेच्या शिष्टमंडळाची आयुक्तांनी भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप तसेच मोरे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फेरीवाल्यांना सकाळी ७ ते रात्री १० व्यवसाय करू द्यावा, वाहतुकीला त्रास होत असेल, अशा फेरीवाल्यांचे पुनर्वसन या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन या वेळी आयुक्तांनी दिले असल्याचे मोरे म्हणाले.