पोलिसांकडून कारवाई नाही; शिरसाट याचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:12 AM2019-02-12T11:12:34+5:302019-02-12T11:13:56+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या;
पुणे : शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांना धमक्या आल्या होत्या, याची माहिती दिल्यानंतरही पोलीस १० दिवस हातावर हात धरुन बसले. त्यामुळे या हत्येमागे हात असलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
विनायक शिरसाट यांचे ३० जानेवारीला अपहरण करून त्यांची हत्या करुन मुठा गावाजवळील घाटात दरीत टाकून दिला होता. तो सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात आणण्यात आला. शिरसाट यांचे नातेवाईक ससून रुग्णालयातील शवागाराजवळ जमले आहेत. याबात विनायक शिरसाट याचे वडील सुधाकर ऊर्फ अण्णा शिरसाट यांनी सांगितले की, ३० जानेवारीला विनायक सकाळी आमच्या जांभुळवाडी येथील कामावर वायरची बंडले घेऊन गेला होता. दुपारी अडीच वाजता त्याच्याशी फोनवर बोलणे झाले़ त्यानंतर त्याने मित्रांना फोन केले होते. त्याने उत्तमनर, शिवणे, नऱ्हे येथील बेकायदा बांधकामाविषयी पीएमआरडीए कडे तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी काहींचे बांधकाम पाडण्यात आले होते. त्यामुळे ४ गावातील लोक त्याला धमक्या देत होते. बिल्डर लॉबीनेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली आहे.
तो जांभुळवाडी येथून ३० जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता जाताना दिसतो. त्यानंतर त्याच रात्री अकरा वाजता नऱ्हे येथील भूमकर चौकात त्याची गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली. ३० जानेवारीला आम्ही भारती विद्यापीठ पोलिसांकडे गेलो़ त्यांनी अपहरणाची तक्रार घेण्याऐवजी केवळ मिसिंगची तक्रार घेतली. अपहरण झाल्याचे लक्षात येत असतानाही ५ दिवस त्यांनी टोलवाटोलवी केली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला़ त्याला कोण कोण बिल्डर धमक्या देत होते़ याची माहिती पोलिसांना देऊनही त्यांनी गेल्या १० दिवसात काहीही कारवाई केली नाही. कारवाई करावी, म्हणून आम्ही पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्त यांना दोनदा भेटलो तरीही कोणीही कारवाई केली नाही़ त्यामुळे आता गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, असे अण्णा शिरसाट यांनी सांगितले़
पुण्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या
विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत होते. त्यात त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. सोमवारी दुपारी पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत एका कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलिसांनी हा मृतदेह दरीतून वर आणला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.