मुरूड दुर्घटनेप्रकरणी कारवाई नाहीच
By admin | Published: April 1, 2016 03:32 AM2016-04-01T03:32:55+5:302016-04-01T03:32:55+5:30
मुरूड येथे घडलेल्या दुर्घटनेत आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेस दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला; मात्र विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार
पुणे : मुरूड येथे घडलेल्या दुर्घटनेत आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेस दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला; मात्र विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आजही गुलदस्तात आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात या विषयावर चर्चा करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार विद्यापीठ व महाविद्यालयांनी सहलीचे आयोजन करणे बंधनकारक आहे. मात्र, आबेदा इनामदार महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सहलीदरम्यान यूजीसीच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे सहलीला गेलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. दोन महिने झालेले तरीही शिक्षण विभागाने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे विधानसभेत याबाबत चर्चा करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी १ एप्रिल रोजी राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर पालक घंटानाद आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, मुरुड दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे समिती स्थापन करण्यात आली होती. एका महिन्याभरात समिती आपला अहवाल सादर करणार होती; मात्र दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही समितीने अहवाल सादर केला नव्हता. परंतु, गेल्या आठवड्यातच पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे व विद्यापीठाकडे अहवाल सादर करण्यात आला असून, हा अहवाल अद्याप गुलदस्तात आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या समितीने चौकशीसाठी आणखी काही दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत या समितीचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला जाणार आहे.
मुरुड दुर्घटनेत दगावलेले विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा केली आहे. संस्थेतर्फे संबंधित विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांस नोकरी देण्याचे तसेच कुटुंबातील मुलांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली जाणार आहे. त्यानुसार काही पालकांनी यास सहमती दर्शविली असून, काही पालकांनी नकार दिला आहे. तसेच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल पूर्ण झाला आहे. या अहवालाबाबत अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता असल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही.
- पी. ए. इनामदार, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी
दोन महिन्यानंतरही विद्यापीठाने व महाविद्यालयाने मुरूड दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई केली नाही. त्यामुळे चालू अधिवेशनात यावर गांभीर्याने चर्चा करून घटनेच्या सखोल चौकशीनंतर दोषींवर करावाई करावी या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (दि.१) दुपारी ३ वाजता राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. पालकांना नोकरीचे आणि मोफत शिक्षणाचे आमिष दाखविण्यापेक्षा संस्थेने दोषींवर करारवाई करावी.
- शिवाजी सलगर, पीडित पालक
पुणे पोलिसांकडून मुरूड दुर्घटनेप्रकरणी कोणतीही चौकशी केली जात नाही. त्यामुळे मुरूड पोलिसांनी तरी या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोषींवर करवाई करावी या मागणीसाठी आम्ही सर्व पालकांनी मुरुड येथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, पुरावे सादर केल्यानंतर आम्ही कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थी समुद्रात बुडाले तेव्हा शिक्षक अंताक्षरी खेळण्यात दंग होते, अशा शिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीसाठी शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे. - सादिक काझी, पीडित पालक