यंदा गणपतीची वर्गणी नाही! पुण्यातील सार्वजनिक गणेशमंडळांचा उत्स्फूर्त व कौतुकास्पद निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 09:08 PM2020-07-24T21:08:30+5:302020-07-24T22:04:21+5:30

कोरोनामुळे आताची परिस्थिती फारच अवघड झाली आहे. लोक चार महिने घरात बसून आहेत, अशावेळी वर्गणी मागणे योग्य नाही...

No amount for Ganesh festival in this year, spontaneous decision of the Ganesh Mandal in Pune | यंदा गणपतीची वर्गणी नाही! पुण्यातील सार्वजनिक गणेशमंडळांचा उत्स्फूर्त व कौतुकास्पद निर्णय

यंदा गणपतीची वर्गणी नाही! पुण्यातील सार्वजनिक गणेशमंडळांचा उत्स्फूर्त व कौतुकास्पद निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवणार  व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट

अतुल चिंचली-
पुणे: दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदर मंडळे गणरायाची आगमनाची तयारी करू लागतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वर्गणीला सुरुवात होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, व्यावसायिक तसेच सामान्य नागरिक सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. गणेशोत्सव मंडळे यंदा वर्गणी घेणार नाहीत. पण कोरोनाबाबत जनजागृती, हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करणे, आरोग्य शिबिरे असे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत. अशी माहिती पेठांमधील गणेशोत्सव मंडळांनी 'लोकमत'ला दिली आहे. 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पा उत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. तर  पुण्याच्या गणेशोत्सवाची जगभरात प्रशंसा केली जाते. शहरात मध्यवर्ती भागात असंख्य गणेश मंडळे आहेत. मंडळाकडून उत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा त्यावर भर दिला जाणार आहे. सर्व समाजाची काळजी घेऊन गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाईल. त्यामुळे वर्गणी घेणारच नाही असे मंडळांनी सांगितले आहे. 


...................................................................
आताची परिस्थिती फारच अवघड झाली आहे. लोक चार महिने घरात बसून आहेत. अशा वेळी वर्गणी मागणे योग्य नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने दिलेल्या वर्गणीतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू. 
                                                                                                       बाबा जसवंते,अध्यक्ष, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ
.......................... ......... ...........................
आमची वस्तीचा भाग संमिश्र आहे. याठिकाणी हातावरचे पोट असणारे, रिक्षावाले, किरकोळ विक्रेते अशी लोक राहतात. आम्ही व्यापारी लोकांकडून यंदा वर्गणी घेणार नाही. पण पुढच्या वर्षीसाठी फक्त व्यापाऱ्यांना पावती देऊन ठेवणार आहोत. म्हणजे पुढच्या वर्षी अडचण येणार नाही. वस्तीत आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे सातत्याने आवाहन करीत आहोत. 
                                                     चेतन शिवले , सामाजिक उपक्रम समिती प्रमुख, श्री काळभैरवनाथ तरुण  मंडळ, गणेश पेठ 
................................................................
सभासदांची इच्छा असेल तर ते वर्गणी देतील. सध्याची परिस्थिती पाहता व्यापारी वर्गाकडे काही मागणार नाही. आम्ही दरवर्षी कसबा पेठेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. पण यंदा साधेपणाने करणार आहोत. तसेच मंडळाच्या वतीने लोकांना मदत करण्याचे काम चालू आहे. 
                                                                                                                    सुशांत कर्डे, अध्यक्ष, जनार्दन पवळे संघ, कसबा पेठ .
.........................................................
यंदा मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संचारबंदीत रेड लाईट भागातील महिलांना धान्याचे किट वाटप केले आहे. व्यापारी किंवा मंडळाचे कार्यकर्ते कोणाकडूनही वर्गणी घेणार नाही. अमृत महोत्सवी वषार्साठी दोन, तीन वर्षांपासून पैसे जमा केले होते. ते सामाजिक उपक्रमासाठी वापरणार आहोत. 
                                  सारंग माडचेट्टी,अध्यक्ष, तरुण अशोक मंडळ, बुधवार पेठ 
................................             ...................
कोरोनाकाळात समाजसेवेचा विडा उचलला आहे. गणेशोत्सवातही तेच करणार आहोत. वर्गणी घेण्यापेक्षा मंडळाच्या वतीने समाजाला मदतीचा हात म्हणून उभे राहत आहोत. पुढील महिन्यात स्वइच्छेने वर्गणी आली तर स्वीकारू. त्याही पैशाचा वापर समाजहितासाठी केला जाईल. 
                                                                         अमित पळसकर , अध्यक्ष, कडबे आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ. 
........................................................
लोकांच्या घरात रेशन नाही. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्सवाचा मूळ हेतू समाजाला एकत्र आणणे हाच आहे. दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त सभासद वर्गणीतून उत्सव करतो. पण यंदा कोणाकडेही पैसे मागणार नाही. 
                                                                                                          प्रशांत मते , अध्यक्ष, सोमवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 
..................................................................
अजून मंडळाची बैठक झाली नाही. शासनाच्या नियमावलीनुसार आमच्या नियोजनाला सुरुवात होणार आहे. पण वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव करण्याचे ठरवले आहे. 
                                                                                                                                           वैभव रोकडे , जयहिंद मित्र, शनिवार पेठ 
......................................................
आमच्या  भागात मध्यमवर्गीय लोक राहतात. तसेच व्यापारीवर्ग कमी आहे. दाटवस्तीच्या भागात असणाऱ्या सर्वांची आर्थिक परिस्थिती वाईटच आहे. त्यामुळे घरोघरी व व्यापारी कोणाकडेच वर्गणी न मागण्याचे ठरवले आहे. 
                                                                                                              - मनोज शिंदे, अभिनव मित्र मंडळ, शिवाजीनगर गावठाण.


 

Web Title: No amount for Ganesh festival in this year, spontaneous decision of the Ganesh Mandal in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.