कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:49 PM2018-10-02T14:49:30+5:302018-10-02T14:55:32+5:30
दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत...
पुणे : दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत. दहशतवाद ही गंभीर समस्या असून कुठलाही धर्म त्याचे समर्थन करीत नाही. दहशतवादाविरुद्ध सगळ्या देशांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे लोणीकाळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचे नायडू यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, राहुल कराड, खासदार विकास महात्मे उपस्थित होते.नायडू म्हणाले, विश्वशांतीचा संदेश देणारा हा घुमट जगातले नवे आश्चर्य म्हणून ओळखले जाईल. राजकारण्यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, प्रशासन कसे चालते याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जग बदलत आहे तसेच भारतही बदलत आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये जगात एकात्मता आणि शांतता नांदली पाहिजे. संत ज्ञानेश्वर यांनी लहान वयात विश्वात शांतता नांदण्याबाबत चिंतन केले, ही थोर परंपरा आपल्याला लाभली आहे.