Pune: हॉटेल ‘वैशाली’प्रकरणी पतीसह बँक अधिकाऱ्यांना ‘नाे जामीन’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:42 PM2023-12-16T12:42:39+5:302023-12-16T12:43:32+5:30
याप्रकरणी आरोपी पतीसह बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे....
पुणे : शहरातील हॉटेल वैशालीचे मूळ मालक जगन्नाथ शेट्टी यांची मुलगी आणि वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे बनावट सह्या, कोरे धनादेश आणि कागदपत्रांच्या आधारे तब्बल पाच कोटी रुपयांचे कर्ज काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आरोपी पतीसह बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
फिर्यादी यांच्यावतीने ॲड. निखिल मालाणी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. यामुळे आरोपींना अटक हाेणार आहे.
वैशाली हॉटेलच्या मालकीण निकिता जगन्नाथ शेट्टी (३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती विश्वजीत विनायक जाधव (४१) यांच्यासह येरवडा येथील कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
ही घटना ७ डिसेंबर २०२२ रोजी फर्ग्युसन रस्त्यावरील निकिता यांच्या नावावर असणाऱ्या ‘निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपी’ या फर्मच्या ऑफिसमध्ये घडली होती. तेथे बसून निकिता यांचे पती विश्वजीत जाधव यांनी कोटक महिंद्रा बँकेतील अधिकारी राजेश चौधरी, फायनान्स कंपनीचे रवी परदेशी यांच्या मदतीने संगनमत करून परस्पर त्यांच्या नावावर ५ कोटींचे कर्ज घेतले. यासाठी त्यांच्या कोऱ्या चेकचा वापर करून स्वतःच्या नावावर ट्रान्स्फर करून अपहार केला होता. या कर्ज प्रक्रियेसाठी फिर्यादींच्या मालकीचा फ्लॅट परवानगीशिवाय तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज देखील घेतले. कर्जदाराची मुलाखत न घेताच कर्ज दिले कसे? यावर प्रश्न उभे राहिले. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील नेवसे, सरकारी वकील ॲड. प्रेमकुमार अगरवाल तर मूळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. निखिल अनिल मालाणी व ॲड. उज्ज्वला पवार यांनी काम पाहिले.