महात्मा फुले योजनेचा लाभच मिळत नाही; दीनानाथ रुग्णालयाबाबत महत्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:26 IST2025-04-05T12:25:26+5:302025-04-05T12:26:16+5:30
रुग्णालयाकडून एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याचे लिहून देण्यात आले आहे

महात्मा फुले योजनेचा लाभच मिळत नाही; दीनानाथ रुग्णालयाबाबत महत्वाची माहिती समोर
पुणे : पुण्यातील तथाकथित प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांच्या हव्यासातून एका गर्भवती महिलेला उपचार करण्यास नकार दिला आणि रुग्णवाहिकाही वेळेवर मिळू न शकल्याने या महिलेने निरागस दाेन बाळांना जन्म देऊन प्राणज्याेत मालवली. गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या अमानुष कृत्याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाचे अनेक कारनामेही आता समोर येऊ लागले आहेत. अशातच दीनानाथ रुग्णालयातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
या रुग्णालयातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याचे लिहून देण्यात आले आहे. परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेतला आहे. सर्वसामान्यांसाठी लागू केलेल्या योजनेचा दीनानाथ रुग्णालयात लाभ मिळत नाही. रुग्णालय प्रशासन हक्काने १ रुपया भाडे तत्वावर सरकारला जमीन मागते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यताही मिळते. मात्र रुग्णालय याच सरकारच्या सरकारी योजना नसल्याचे रुग्णांना सांगत आहे. या धक्कादायक माहितीमुळे रुग्णालयाबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागेल आहेत.
महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे?
महात्मा फुले जन आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आली आहे. ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, रुग्णालयात दाखल झाल्यावर आजारांसाठी रोखरहित वैद्यकीय सेवा दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, पांढरे, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा अंत्योदय अन्न योजना कार्ड किंवा अन्नपूर्णा कार्ड असणे आवश्यक आहे
थकवला महापालिकेचा २७ कोटींचा मिळकतकर
रुग्णालय चालविणाऱ्या लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनने २०१९-२० पासून एकही रुपयांचा कर भरलेला नसल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा कर थकवला आहे.