रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ येईना ..!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:27 PM2018-09-20T16:27:17+5:302018-09-20T16:32:17+5:30
अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याबाबत जाणीव नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात.
पुणे : धर्मादाय रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावण्याचे बंधन करण्यात आले असतानाही त्याकडे काही खासगी रुग्णालयांनी दुर्लक्ष केले आहे. अद्यापही अनेक रुग्णालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही.
अनेक खासगी रुग्णालयांमधील चकचकीतपणामुळे रुग्णांना हे रुग्णालय धर्मादाय असल्याबाबत जाणीव नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजनेपासून वंचित राहतात. संबंधित रुग्णालय धर्मादाय असल्याचे रुग्णांना लगेच कळावे, यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी काही दिवसांपुर्वी रुग्णालयांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक केले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ५६ रुग्णालयांना हा निर्णय लागु होणार आहे. तसेच कोल्हापुर व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी सुमारे २० आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ रुग्णालयांचाही यामध्ये समावेश आहे.
काही रुग्णालयांनी निर्णयानंतर लगेचच नावापुढे धर्मादाय हा शब्द लावला आहे. तर काही रुग्णालयांच्या नावामध्ये आधीपासूनच हा शब्द आहे. याबाबत संबंधित रुग्णालयांनी धर्मादाय कार्यालयाला कळविले आहे. पण अद्यापही अनेक रुग्णालयांच्या नावामध्ये बदल झालेला दिसत नाही. या रुग्णालयांची नावे पूर्वीप्रमाणेच असून निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दरम्यान, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक भारत पक्षातर्फे गुरूवारी (दि. २०) दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय व रूबी हॉलसमोर आंदोलन करण्यात आले. लक्ष्मण चव्हाण, अमोल पवार, सागर शेडगे, अनिल करंजावणे, सोपान वांजळे, दत्ता तेरदाळे, विशाल गोडांबे, सदानंद तोंडे आदी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. इतर रुग्णालयांसमोरही आंदोलन केले जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
-------------
रुग्णालयांच्या बैठकीमध्ये सर्वांनी नावामध्ये धर्मादाय हा शब्द घालण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बहुतेक रुग्णालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये नवीन नाव लावणे, अपेक्षित आहे. त्यानुसार बदल कले जात असून रुग्णालयांकडून याबाबत कळविण्यात येत आहे.
- नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग