एक महिन्यानंतरही नशिबी हताश हाेऊन बसणं ; दांडेकर पूल वसाहतीतील लाेकांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:23 PM2018-10-27T18:23:11+5:302018-10-27T18:27:28+5:30
मुठा कालवा दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला तरी येथील अनेक नागरिकांना मदत मिळाली नसल्याने हताश हाेऊन बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याजवळ उरलेला नाही.
पुणे : मुठा कालवा फुटलेल्या दुर्घटनेला एक महिना उलटून गेला तरी येथील अनेक नागरिकांच्या नशिबी केवळ हताश हाेऊन बसण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. सराकराने, पालिकेने अनेक अाश्वासने दिली परंतु महिन्याभरानंतही ही अाश्वासने हवेतच विरुन गेल्याचे चित्र अाहे. येथील काही लाेकांना इतरत्र घरे मिळाली परंतु बहुतांश कुटुंबे घराच्या प्रतिक्षेत अाहेत. त्यामुळे घरच नाही तर दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न येथील नागरिकांच्या समाेर उभा ठाकला अाहे.
एक महिन्यापूर्वी 27 सप्टेेंबर राेजी सकाळी 10.30 च्या सुमारास पुण्यातील मुठा कालवा फुटला. लाखाे लिटर पाणी वेगाने दांडेकर पूल वसाहतीत शिरले. काही कळायच्या अात हाेत्याचे नव्हते झाले. येथील शेकडाे कुटुंबे बेघर झाली. त्यानंतर महापालिकेने तसेच मुख्यमंत्र्यांनी लाखाे रुपयांच्या मदतीची घाेषणा केली. परंतु ही मदत लालफितीच्या कारभारातच विरुण गेली अाहे. अनेकदा पंचनामे करुनही येथील अनेकांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. यातील अनेकांना राहण्यासाठी घर नसल्याने पैसे नकाे घर बांधून द्या अशी मागणी ते करत अाहेत. ज्यांची घरे या प्रलयात नष्ट झाली त्यातील काही लाेक हे नातेवाईकांकडे राहतात तर काहीजण येथील समाज मंदीर अाणि बुद्ध विहारात वास्तव्यास अाहेत. राेज सकाळी उठून तुटलेल्या घरांकडे पाहत अाज न उद्या सरकार घर बांधून देईल या अाशेने अनेकजण बसलेले असतात. घरच नसल्याने काहीजण महिन्याभरापासून कामावर जाऊ शकलेले नाहीत. काही समाजसेवी संस्था कपडे अाणि जेवण या लाेकांना देतात. पण ते तरी किती दिवस देणार अाणि अाम्ही किती दिवस तुटलेल्या घराकडे बघत बसायचं असा उद्विग्न सवाल येथील नागरिक उपस्थित करतात.
येथे राहणाऱ्या ललिता चतूर म्हणाल्या, महिना झाला तरी अाम्हाला कुठलिही मदत मिळाली नाही. अनेक पंचनामे करण्यात अाले परंतु मदत काही मिळाली नाही. अाम्ही राेज हताश हाेऊन अामच्या तुटलेल्या घराकडे पाहत बसताे. सरकारने अाम्हाला घर बांधून द्यायला हवे. अर्चना डिमडिमे म्हणाल्या, अनेक अाश्वासन मिळाली पण घर काही मिळालं नाही. दिवाळी सण अाला अाहे. अाम्हाला घरच राहिलं नाही, तर अाम्ही सण कसा साजरा करणार. सरकारने अामच्याकडे लक्ष द्यायला हवे. अशीच काहीशी व्यथा येथील अनेकांची अाहे. सराकराने लवकरात लवकर घरे बांधून द्यावीत अशी मागणी हे करत अाहेत.