परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:44 PM2019-07-26T12:44:28+5:302019-07-26T12:46:54+5:30
स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव आहे.
पुणे : घटनेची आखणी करताना स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता, समता आदी मुल्यांची रुजवात घालण्यात आली होती. मात्र दहशतमुक्त समाजनिर्मितीकडे वाटचाल होण्याऐवजी घटनेतील मुल्ये संस्कारात आणि शिक्षणात रूजू शकलेली नाहीत. राजकीय पक्ष, त्याचे नेतृत्व आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील संवाद खुंटत चालला आहे. जनता आणि नेतृत्व यांच्यात संवाद घडवून आणण्याची जबाबदारी ही राजकीय पक्षांची देखील आहे.स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव असल्याची खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉॅँग्रेस पक्षाचे नेते व साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीरत्न रवींद्र माळवदकर यांना शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिल्याबद्दल डॉ. बाबा आढाव व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद आडकर होते तसेच महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे सल्लागार डॉ. गौतम बेंगाळे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक अनिल टिंगरे, रमेश बागवे, चेतन तुपे, दादासाहेब सोनवणे, लता राजगुरु, सुवर्णा डंबाळे उपस्थित होते.
भारतीय समाजात कधी नव्हे तेवढी असहिष्णुता वाढत आहे. तरुणांना जातीय दंगलीत गुंतवून विनाकारण अस्मिता जागविण्याचे खोडकर काम हेतुपुरस्कर सुरु आहे याकडे डॉ.आढाव यांनी लक्ष वेधले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय राज्यघटनेने कोणत्याही धमार्चे कुंकु लावलेले नाही. तेव्हा धार्मिक समाज व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष नागरिकांचा नवा समाज निर्माण करण्याचे आवाहन आपल्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष कार्यकतर््यांची जबाबदारी वाढली आहे. सत्ता हे मानवी कल्याणाचे साधन आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना रविंद्र माळवदकर म्हणाले, नाना पेठेमध्ये मिश्र जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. १६ मे १९७३ रोजी झालेल्या दंगलीने मन विषण्ण झाले. जाती-जातींमध्ये सलोखा वाढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. साखळीपीर तालीन राष्ट्रीय मारुती मंदीर हे सामाजिक सलोख्याचे केंद्र बनले. गाडगे महाराज, भाई वैद्य, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, बाबा आढाव यासारख्यांच्या वैचारिक मेजवानीचा मी साक्षीदार झालो. त्यामुळे माज्यावर नकळतपणे धर्मनिरपेक्षतेचे संस्कार झाले.
अ?ॅड. प्रमोद आडकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान संवर्धन समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.