नो कन्फ्युजन थेट दिला पुरावा :पी. चिदंबरम यांच्या ट्विटला विमानतळ प्रशासनाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 08:24 PM2020-02-08T20:24:55+5:302020-02-08T20:26:31+5:30
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पुणे विमातळावरील पाणी बाटलीच्या किंमतीवरून केलेले ट्विट व्हायरल झाले असून त्याला एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया'नेही तात्काळ उत्तर दिले आहे.
पुणे : सोशल मिडीयावर एखादी गोष्ट टाकली की तिची चर्चा होण्यास जास्त काळ लागत नाही. असाच अनुभव पुण्यात आला आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पुणे विमातळावरील पाणी बाटलीच्या किंमतीवरून केलेले ट्विट व्हायरल झाले असून त्याला एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया'नेही तात्काळ उत्तर दिले आहे. नुसते उत्तर नाही तर पुरावा म्हणून थेट फोटो जोडून स्वतःच्या माहितीला ठळक दुजोरा दिला आहे.
Why is a bottle of water (the so called mineral water) sold for Rs 60 by the concessionaire at the Pune airport? @AAI_Official@HardeepSPuri
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 7, 2020
याबाबत अधिक माहिती अशी की, पी चिदंबरम यांचे शुक्रवारी पुण्यात व्याख्यान होते. त्यावेळी त्यांनी विमान मार्गाने ये-जा केली. या प्रवासादरम्यान त्यांना पुणे विमानतळावर ६० रुपये दराने पिण्याच्या पाण्याची बाटली मिळाली. त्यावर त्यांनी ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी पुणे विमानतळावर 'व्हेंडिंग मशीन बसवले तर किमान २५ रुपयांपर्यंत दर येऊ शकतो' अशी सूचनाही केली. या ट्विटमध्ये त्यांनी एअर ऍथॉरिटी ऑफ इंडिया आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांना टॅग केले.
हमारे हवाई अड्डे की इस दुकान पर कॉफी ₹25 की चाय ₹20 की और पानी ₹10 का मिलता है
— PuneAirport (@aaipunairport) February 8, 2020
आपकी सेवा में तत्पर पुणे हवाई अड्डा@PChidambaram_IN@AAI_Official@HardeepSPuri@aairedwrpic.twitter.com/VgW9zDyixR
त्यांच्या ट्विटची तात्काळ दखल घेत पुणे एअरपोर्ट अकाऊंटवरून थेट एक फोटोच शेअर करण्यात आला. त्यात पाण्याची बाटली १० रुपये, चहा २० रुपये आणि कॉफी २५ रुपये असे दरपत्रक होते. इतकेच नव्हे तर 'हमारे हवाई अड्डे की इस दुकान पर कॉफी ₹25 की चाय ₹20 की और पानी ₹10 का मिलता है. आपकी सेवा में तत्पर पुणे हवाई अड्डा' अशी ओळही सौजन्यपुर्वक टाकण्यात आली. या ट्विटचे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाल्याने या ट्विटर प्रश्नोत्तरांची चर्चा सोशल मीडियात रंगली होती.