ना धर्मांतर, ना विरोध...आम्ही नांदतो सौख्यभरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:36+5:302020-11-26T04:27:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमच्यावर ना कुणी धर्मांतराची सक्ती केली ना आम्हाला कधी कुटुंबीयांनी त्रास दिला. विशिष्ट धर्माच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आमच्यावर ना कुणी धर्मांतराची सक्ती केली ना आम्हाला कधी कुटुंबीयांनी त्रास दिला. विशिष्ट धर्माच्या चालीरितींचे पालन करण्याचीही बळजबरी आम्हावर आजवर कोणी केलेली नाही. आमच्या प्रेमविवाहाला अनेक वर्षे झाली. आम्ही सुखाने नांदतो आहोत. हिंदू-मुस्लिम या भिन्न धर्मियांच्या विवाहांना वेगळे वळण का लावले जात आहे हे समजत नाही,” या प्रतिक्रिया आहेत हिंदु-मुस्लिम विवाह यशस्वी झालेल्या जोडप्यांच्या.
विविध धर्मांमधील तरूणींना प्रेमाच्या जाळयात ओढून त्यांच्याशी निकाह करून ‘लव्ह जिहाद’ धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची राळ सध्या उठवली जात आहे. या संदर्भाने ‘लोकमत’ने हिंदू-मुस्लिम जोडप्यांशी संवाद साधला.
विशाल विमल आणि डॉ. आरजू तांबोळी हे दोघेही चळवळीतले कार्यकर्ते. विशाल हिंदू तर आरजू मुस्लिम. आठ वर्षांपूर्वी ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्री व प्रेमात आणि प्रेमातून विवाह कधी झाला हे दोघांनाही कळले नाही. विशाल सांगतो, “हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या कायद्यानुसार धर्मांतर केल्याशिवाय आम्हाला लग्न करता येत नाही. पण आम्ही ‘स्पेशल मँरेज अँक्ट १९५४ नुसार लग्न केले. यात दोघांनाही धर्मांतर करण्याची गरज नसते. एकप्रकारे सरकारच तुमचे पौराहित्य करते. मात्र धर्मांतर करण्यासाठी आमच्यावरही दबाव टाकण्यात आला होता. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे तिचं नाव देखील बदलेले नाही. दोघांच्या कुटुंबीयांनी आमचा या लग्नाचा स्वीकार केला हे जास्त महत्वाचे. त्यांच्याशी आमचा सुरूवातीपासूनच संवाद होता. उलट तिच्या कुटुंबीयांशी इतर नातेवाईंकानी संवाद तोडला. पण आम्ही सर्वांची नाराजी दूर करण्यात ५० टक्क्यांपर्यंत यशस्वी झालो आहोत.”
-----------------------------------------------