दुर्दशेला पाकिस्तानच जबाबदार, दहशतवादाला आश्रय दिला तर दुसरं काय होणार?, जयशंकर यांनी सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:34 AM2023-02-24T08:34:39+5:302023-02-24T08:36:11+5:30
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले.
पुणे-
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या आजच्या दुर्दशेला स्वत: पाकिस्तानच जबाबदार असल्याचं जयशंकर म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय दिला गेला तर आणखी काय होणार? असंही ते पुढे म्हणाले. पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
"ज्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद हा असेल तो देश कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि कधीच समृद्ध शक्ती म्हणून उदयास येऊ शकत नाही", असं एस. जयशंकर म्हणाले.
दहशतवाद हाच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधांचा मूलभूत मुद्दा आहे. ज्याला अजिबात नाकारता येऊ शकत नाही आणि आपण मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असंही ते म्हणाले. पाकिस्तानचं नाव न घेता जयशंकर म्हणाले की, प्रत्येक देशानं आपल्या आर्थिक अडचणींवर तोडगा काढणं गरजेचं असतं. तसंच आपल्या राजकीय आणि सामाजिक मुद्दयांचीही अडचण सोडवायची असते. पाकिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबतच्या मुद्द्यावर जयशंकर यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी देशातील स्थानिक भावनांचा विचार करणं गरजेचं आहे असं म्हटलं.
पाकिस्तानचा मूळ उद्योग दहशतवाद
जेव्हा एखादा देश गंभीर आर्थिक संकटात असतो तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी धोरणात्मक पर्याय शोधावे लागतात. यातूनच एखाद्या देशाला आपले आर्थिक मुद्दे सोडवावे लागतात. तसंच देशाला आपल्या राजकीय मुद्द्यांनाही सांभाळावं लागतं. जर एखाद्या देशाचा मूळ उद्योग दहशतवाद असेल तर कोणताही देश कधीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही आणि समृद्ध होऊ शकत नाही, असं जयशंकर म्हणाले.