‘युती होईल असे सध्याचे चित्र नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:53 AM2018-09-12T04:53:39+5:302018-09-12T04:53:56+5:30
भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे.
पुणे : भाजप-सेनेने एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर इतरांचा टिकाव लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र सध्या दोन्ही पक्ष विरोधी पक्षांसारखे वागत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील, असे चित्र दिसत नाही, असे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी युतीबाबत साशंकता व्यक्त केली.
युतीमध्ये असूनही भाजपचा एककल्ली कारभार चालू आहे आणि सेना विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसली असल्यासारखी वागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीनीने जोशी यांच्याशी संवाद साधला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप-सेना एकत्र येण्याची काही चिन्हे दिसतात का, याविषयी विचारले असता त्यांनी दोन्ही पक्षांकडून युतीबाबत कोणतेही सकारात्मक संकेत दिलेले नसल्याचे सांगितले.
ज्या काळात मी सेनेचा मुख्यमंत्री होतो किंवा लोकसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळी भाजप-सेनेमध्ये युती होती. आज युतीबाबत दोन्ही पक्षांकडून संमती मिळत नाही. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करणे आणि सर्व बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे, असेही जोशी म्हणाले.