रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात, वितरकांची ओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 09:11 PM2018-04-14T21:11:40+5:302018-04-14T21:11:40+5:30
यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे.
पुणे: स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, तांदूळ या धान्यांसह तूरडाळीचे वितरण केले जात असले तरी, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे. तसेच ग्राहकांकडून या तुरडाळीला फारशी मागणी नाही. त्यामुळे रेशनच्या तुरडाळीला ग्राहक मिळेनात,असे स्वस्त धान्य वितरकांकडून सांगितले जात आहे.मात्र,येत्या सोमवारी यासंदर्भात प्राप्त होणा-या अहवालावरून चित्र स्पष्ट होईल. यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये ५५ रुपये प्रतिकिलो दराने तुरडाळ विकली जात आहे. त्याचप्रमाणे डाळ चांगल्या दर्जाची असल्याचा दावाही विभागाने केला आहे. परंतु, घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तुरडाळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, दोन्ही दाळींच्या दरात फारसा फरक नाही. त्यामुळे या तूरडाळीस उठाव नाही. परिणामी अन्न धान्य वितरकांकडून ही डाळ उचलली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांना गहू, तांदूळ या धान्याबरोबरच तुरडाळीचे वितरण करणे अपेक्षित आहे. काही वितरकांकडून तुरडाळ उचलली जात नसल्याने संबंधित वितरकांना गहू व तांदूळाचेही वितरण करू नका, अशा सूचना अन्न धान्य वितरण अधिका-यांनी दिले आहेत. परिणामी कोणतीही तक्रार न करता वितरकांना आपल्या भागातील शिधापत्रिका धारकांना तुरडाळ विकावीच लागणार आहे. दरम्यान, एका अन्न धान्य वितरकाने सांगितले,काही महिन्यांपासून तुरडाळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. एका महिन्याला २५ ते ५० किलोच तुरडाळीची विक्री होते. रेशनची तूरडाळ शिजत नाही, अशी नागरिकांची धारणा झालेली आहे. मात्र, सर्वांना तुरडाळ विक्रीच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाकडून दिली जाणारी सर्व तूरडाळ ग्राहकांना विकण्याचा प्रयत्न करावा लागेल.
---------------------------
शहरात सर्वत्र तुरडाळीची विक्री सुरळीतपणे सुरू आहे. तसेच कोणत्या भागात कोणत्या दुकानात किती किलो तुरडाळीची विक्री झाली याबाबतची माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.येत्या सोमवारी सर्व दुुकानांची माहिती प्राप्त होईल. त्यावरून शरातील तुरडाळ विक्रीबाबतचे चित्र स्पष्ट होेईल.
- आर.बी.पोटे, अन्न धान्य पुरवठा अधिकारी ,पुणे शहर