Pune Corona News: दिलासादायक, शहरात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 07:10 PM2021-11-05T19:10:20+5:302021-11-05T19:12:05+5:30
सक्रिय रुग्णांचे प्रमाणही हळूहळू कमी होऊ लागले आहे
पुणे : शहरात गेल्या कित्येक दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत राहिली आहे. तसेच सक्रिय रुग्णांचे प्रमाणही हळूहळू कमी होऊ लागले आहे. दिवसाला दोन, तीन मृत्यूची नोंद होत असताना आता मागील महिन्यापासून दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. अनेक वेळा एकही मृत्यू न झाल्याची नोंद झाली आहे. त्यातच शुक्रवारी ५ नोव्हेंबरलाही शहरात कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. दिवसभरात ३ हजार ३३२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून नवे ५४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ६१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ७२० इतकी असून, यापैकी १०० जण गंभीर आहेत. शहरात आतापर्यंत ५ लाख ४ हजार ६४३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ८४७ जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत शहरात ९ हजार ७६ जणांचा मृत्यू झाला आहे.