'इग्नू' कोणत्याही परिस्थितीत ज्योतिष विषय शिकविण्याचा निर्णय मागे घेणार नाही; ब्राह्मण महासंघासह राज्यातील ज्योतिष संस्थांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:46 PM2021-06-30T17:46:21+5:302021-06-30T18:07:54+5:30
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) आता ज्योतिषशास्त्र विषय शिकवण्याला मान्यता दिली आहे.
पुणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) आता ज्योतिषशास्त्र विषय शिकवण्याला मान्यता दिली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वैज्ञानिक संस्था यांच्यासह पुरोगामी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. पण हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.तर काही संघटनांनी विद्यापीठाच्या ज्योतिषशास्र विषय शिकविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना त्याचे समर्थन देखील केले आहे. या वादात आता ज्योतिष संस्थांसह ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे.
महाराष्ट्रातील ७० ज्योतिष संस्थासह ब्राह्मण महासंघाने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) या संस्थेला पत्र दिले आहे. यावेळी ब्राह्मण महासंघ व ज्योतिष संस्थांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील ७० ज्योतिष संस्थासह महासंघाने इग्नू आता ज्योतिषशास्त्र शिकवण्याच्या संस्थेच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्याचे समर्थन देखील केले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कोर्स मागे घेतला जाणार नाही असं आश्वासन संस्थेने आम्हाला दिले असल्याची माहिती दिली आहे.
इग्नू यंदापासून ज्योतिषशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए) आणि पदविका (डिप्लोमा) सुरू करणार आहे. नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. हिंदी आणि संस्कृत माध्यमातून हा अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाच्या ५७ प्रादेशिक केंद्रांवर हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो यावर हा अभ्यासक्रम बेतलेला असेल. ज्योतिषशास्त्र, ग्रह-ताऱ्यांचे परिणाम, कुंडली याबाबत अनेक मतभेद आहेत. मात्र आता त्याला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा देण्याचा प्रयत्न इग्नूकडून सुरु आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी काही वर्षांपूर्वी केला होता. मात्र देशातील अभ्यासक आणि वैज्ञानिकांनी एकत्रित येत तो प्रयत्न हाणून पाडला होता. मात्र, आता इग्नू पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा घाट घालत असल्याचे दिसत आहे.