कलेला डिग्री लागत नाही : राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:50 AM2020-02-04T11:50:09+5:302020-02-04T11:50:46+5:30
झील इन्स्टिट्युट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यावतीने आयाेजित व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
पुणे : प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते. ती प्रत्येकाने जाेपासली पाहीजे, कारण कलेला कुठलिही डिग्री लागत नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष (मनसे) राज ठाकरे यांनी व्यक्त केले. 'झील इन्स्टिट्युट' आणि 'कार्टुनिस्ट कंबाईन' यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याच्या 'इंक अलाइव्ह' या कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला ठाकरे उपस्थित हाेते. या कार्यशाळेचे उद्घाटन व्यंकचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला पालक हवे हाेते. आपल्या मुलांच्या अंगी असलेली कला पाहून त्यांना काय मार्गदर्शन करायला हवे हे त्यांना कळाले असते. राज्य सरकार चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकते, त्यामुळे अशा संस्था उभ्या राहणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या अंगी जी कुठली कला असेल त्याने ती जाेपासली पाहीजे. कलेला डिग्री लागत नाही. मी जे. जे. स्कुल ऑफ आर्टसमध्ये शिक्षण घेतले. तिसऱ्या वर्षाला मी शिक्षण साेडले. मला राजकीय चित्रकार व्हायचे हाेते. मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिलांकडून व्यंगचित्र शिकलाे. मला व्यंगचित्रकार हाेण्यासाठी कुठल्या डिग्रीची गरज लागली नाही.
आज पुण्यात केवळ व्यंगचित्राचा कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे राज ठाकरे यांनी आवर्जुन सांगितले. व्यंगचित्राच्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरुन आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्राचे प्रात्याक्षिक तुम्हाला पाहायला मिळाले हे तुमचं भाग्य असल्याचे राज ठाकरे उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.