'इमर्जन्सी'मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही; दीनानाथ रुग्णालयाचे परिपत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:03 IST2025-04-05T11:03:38+5:302025-04-05T11:03:46+5:30

विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल

No deposit will be taken from any patient in emergency; Dinanath Hospital circular issued | 'इमर्जन्सी'मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही; दीनानाथ रुग्णालयाचे परिपत्रक जारी

'इमर्जन्सी'मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही; दीनानाथ रुग्णालयाचे परिपत्रक जारी

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. अशातच रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. 

केळकर म्हणाले, 2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.

कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले. 

हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -'असंवेदनशीलता' अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा. झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.

जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो. वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही. असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

Web Title: No deposit will be taken from any patient in emergency; Dinanath Hospital circular issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.