Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:31 PM2024-08-07T12:31:21+5:302024-08-07T12:31:46+5:30

नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तरुणाच्या आईची पोलिसांना विनंती

No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune | Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

लष्कर : नशेच्या गोळ्या सेवनाची सवय झालेल्या युवकाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यावर तेथे नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत म्हणून युवकाने स्वच्छतागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी येथील नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात सकाळी सहा वाजता उघड झाली.

अनुप लोखंडे (वय २१, रा. ताडीवाला रस्ता), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनुप लोखंडे (वय २१) याला ताडीवाला रस्ता या ठिकाणी नशेच्या गोळ्यांचे व्यसन लागले होते. याच भागात राहणाऱ्या आणि दारूचा धंदा करणाऱ्या राजू पवळे यांच्या मुलाकडून अनुप नशेच्या गोळ्या घेत असे. १ ऑगस्टला अनुप अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यासाठी सारसबाग येथे गेला होता. त्या ठिकाणाहून तो नशेच्या अवस्थेत दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता घरी आला; परंतु त्यावेळी त्याच्याकडे त्याची गाडी आणि मोबाइल नव्हता, तो आजपर्यंत मिळालेला नाही. त्याच्या आईने त्याला त्याच दिवशी हिंजवडी येथील नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले; परंतु मंगळवारी पहाटे त्याने बाथरूममध्ये टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनुपला नशेची सवय लावणाऱ्या त्याच्या मित्रांना आणि नशेच्या गोळ्याचा पुरवठा करणाऱ्या राजू पवळे यास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अनुपच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे. याबाबत बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणीचे काम सुरू आहे.

ताडीवाला रस्ता भागात मोठ्या प्रमाणात नशेच्या पदार्थाची खुलेआम विक्री होते. याला पोलिसांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत. मी माझा मुलगा त्यामुळे गमावला आहे. माझ्यावर आलेली वेळ कोणावर येऊ नये, ही इच्छा आहे. पोलिसांनी नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. - भारती लोखंडे (मृत युवकाची आई)

तक्रारदाराने दिलेल्या जबाबानुसार चौकशी सुरू आहे केली, चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.- रवींद्र गायकवाड (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंड गार्डन पोलिस ठाणे)

Web Title: No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.