शाळेतच नाही दक्षता

By admin | Published: July 29, 2015 12:52 AM2015-07-29T00:52:28+5:302015-07-29T00:52:28+5:30

लैंगिक अत्याचार अथवा शोषण; मग ते बालकांवरील असो किंवा अल्पवयीन मुलांवरील, त्याची सीमारेषा आता घरातील उंबरठा ओलांडून शाळेच्या परिघापर्यंत पोहोचली आहे.

No efficiency in school | शाळेतच नाही दक्षता

शाळेतच नाही दक्षता

Next

- नम्रता फडणीस/सायली जोशी,  पुणे

लैंगिक अत्याचार अथवा शोषण; मग ते बालकांवरील असो किंवा अल्पवयीन मुलांवरील, त्याची सीमारेषा आता घरातील उंबरठा ओलांडून शाळेच्या परिघापर्यंत पोहोचली आहे. हो, आमच्यावर असे प्रसंग उद्भवले आहेत किंवा या त्रासातून आम्ही जात आहोत, हे वास्तववादी चित्र अधोरेखित करणाऱ्या काही घटना पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरातच उजेडात आल्या आहेत. मात्र त्याचे गांभीर्य अद्याप प्राथमिक आणि माध्यमिक शाळांपर्यंत पोहोचलेले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समितीअंतर्गत जशा लैंगिक तक्रार निवारण समित्या स्थापन करणे बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे शालेय स्तरावरही विद्यार्थ्यांसाठी दक्षता समित्या निर्माण करणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश शाळा अशी कुठली स्थापन करायची असते, याबाबतच अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत सर्वेक्षणा’तून समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शाळांमधील मुला-मुलींवर लैंगिक शोषण व अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मुला-मुलींंवर असे प्रसंग उद्भवतात, त्याची ना शाळांना कल्पना असते ना घरच्या मंडळींना त्याचे सोयरसुतक असते. जोपर्यंत मुले-मुली आपणहून या गोष्टी सांगण्यासाठी पुढे येत नाहीत, तोपर्यंत कुणालाच त्याचा पत्ता लागत नाही. आजही अशी अनेक मुलं-मुली असतील जी अशा प्रसंगांना सामोरे जातही असतील. पण त्यांना या गोष्टी विश्वासात घेऊन सांगण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत नाही. साधारणपणे तीन वर्षांपूर्वी शासनाने शाळा व महाविद्यालयांमध्येही दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये शासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी अशा शाळांचा समावेश आहे. मात्र ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीमधून बहुतांश शाळांमध्ये अशा समित्यांची स्थापनाच झाली नसल्याचे समोर आले आहे. काही शाळांनी तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली आहे; मात्र हे प्रमाण बोटावर मोजण्याइतकेच आहे. या शाळांचा बोध इतर शाळा घेणार का? हा मुळात प्रश्न आहे.

शासकीय कार्यालये व खासगी कंपन्या यांच्यासह शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता समिती असणे आवश्यक आहे. तसेच ही समिती स्थापन करण्याचे काही निकष आहेत. त्यानुसार समितीमध्ये अध्यक्ष, सचिव व सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी इत्यादींचा समावेश असणे आवश्यक आहे. महिन्याला त्याच्या बैठका घेऊन समितीच्या कामाचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यवाही व्हावी असे आदेश आहेत. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शाळांमध्ये दक्षता समिती असणे आणि त्या माध्यमातून तक्रारींचे योग्य पद्धतीने निवारण होणे गरजेचे आहे.
- सुमन शिंदे,
माजी शिक्षण उपसंचालिका

शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसे आदेश आम्ही सर्व शाळांना दिलेले आहेत. परंतु अशा प्रकारे समिती स्थापन केलेली आहे की नाही याविषयी प्रत्येक शाळेत जाऊन तपासणी करणे व्यावहारिकपणे शक्य झालेले नाही. तसेच शाळांमध्ये अशा प्रकारच्या समित्या नसल्या तरीही मुख्याध्यापक हा शाळेचा एका अर्थाने पालकच असतो. त्यामुळे विद्यार्थिनी आपल्याला असणाऱ्या समस्या मुख्याध्यापिकांसमोर मांडू शकतात.
- बबन दहीफळे,
शिक्षण मंडळ प्रमुख

आमच्या शाळेत विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्यासाठी दक्षता समितीची स्थापना केलेली आहे. यामध्ये समुपदेशकाचीही नेमणूक करण्यात आलेली असून, आवश्यकतेनुसार विद्यार्थिनींचे समुपदेशनही केले जाते. अशा प्रकारची समिती शाळेत आहे याविषयी विद्याथिनींना वेळोवेळी जागरूक करण्याचे कामही केले जाते. त्यासाठी शाळेत ठिकठिकाणी समिती असल्याचे फलकही शाळेत लावण्यात आले आहेत. ४ ते ५ वर्षाच्या विद्यार्थिनीपासून ते ५० वर्षांच्या शिक्षिकेपर्यंत सर्वांची काळजी घेतली जाते.
- अलका काकतकर,
मुख्याध्यापिका, हुजूरपागा शाळा

शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विशिष्ट व्यासपीठ असणे गरजेचेच आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आता वाढत असल्याने पूर्वीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिकपणे लक्ष देणे शिक्षकांना शक्य होत नाही. तसेच एखाद्या शाळेत नियमाप्रमाणे समितीची स्थापना झालेली असेल तरी त्या समितीमार्फत योग्य पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. तसेच समुपदेशन, विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निवारण हे अतिशय जबाबदारीचे काम असून त्या समितीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या अतिशय जबाबदार असायला हव्यात.
- विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी काम करणारी दक्षता समितीची अद्याप स्थापना केलेली नाही. परंतु शाळेतील सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी योग्य तो संवाद असतो. त्यामुळे विद्यार्थी अतिशय मोकळेपणाने शिक्षकांसमोर आपल्या समस्या मांडू शकतात व शिक्षिका वेळोवेळी त्यांना मार्गदर्शनही करतात. तसेच शाळेत मुले आणि मुली एकत्रित शिक्षण घेत असल्याने सामाजिक संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशांळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे शाळेत समिती नसली तरीही विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाते.
- जागृती मनाकांत, मुख्याध्यापिका, सरस्वती भुवन इंग्लिश स्कूल

Web Title: No efficiency in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.