आता साहित्य संमेलनासाठी निवडणूक नाहीच; संमेलनाध्यक्षपद सन्मानानं बहाल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 08:14 PM2018-07-01T20:14:40+5:302018-07-01T20:56:42+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवड केली जावी, असा महत्वपूर्ण निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवड केली जावी, असा महत्वपूर्ण निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न होता निवड व्हावी, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने पुढाकार घेण्यात आला होता. याबाबतचा महत्वपूर्ण ठराव मसापच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ८ एप्रिल रोजी एकमताने मंजूर करण्यात आला होता. याबाबत मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ आणि मुंबई साहित्य संघाशीही संपर्क साधण्यात आला होता.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या बाबतची आग्रही भूमिका मातृसंस्था म्हणून साहित्य परिषद घेतली होती. याबाबत रविवारी (१ जुलै) नागपूरमध्ये साहित्य महामंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत हा प्रस्ताव दोन तृतीयांश मतांनी मंजूर करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेने या प्रस्तावाला विरोध केला. मात्र, इतर संलग्न, घटक आणि समाविष्ट संस्थांनी दुजोरा दिल्याने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.