सोलापूर रस्त्यांवरून पुण्यात येण्यास जड वाहनांना 'नो एंट्री' ? वाहतूक शाखेकडून प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 07:53 PM2020-11-02T19:53:05+5:302020-11-02T19:54:17+5:30
वाहनांची वाढती गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन प्रस्ताव वाहतूक शाखेकडून सादर
पुणे : वाहनांची वाढती गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सोलापूर रोडसह ६ रस्त्यांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी घालण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेकडून सादर करण्यात आला आहे. त्यावर १६ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करुन त्यानंतर अंतिम आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.
पुणे- सोलापूर रोडवरील रामटेकडी चौक ते गोळीबार मैदान चौक, पार्वती रोडवरील लुल्लानगर चौक ते खाणे मारुती चौक, प्रिन्स ऑफ व्हेल ड्राईव्ह रोडवरील लुल्लानगर चौक ते भैरोबानाला चौक, लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील भैरोबा नाला चौक ते घोरपडी जंक्शन, शिवरकर रोडवरील फातिमानगर चौक ते एबीसी फार्म चौक आणि संपूर्ण क्रिकेटपटू बापू सिधये मार्गावर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी असणार आहे.
सोलापूर रोडवरुन मार्केटयार्ड तसेच बांधकामासाठी लागणारे वाळूचे ट्रक, इतर साहित्य घेऊन येणारी जड वाहने शहरात येत असतात. त्यांना यापुढे पुण्यात येताना हडपसरच्या पुढे सोलापूर रोडचा वापर करता येणार नाही. त्यांना कात्रज, कोंढवा बाह्य रोडचा वापर करुन शहरात यावे लागेल.