कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात स्वातंत्र्य दिनी पर्यटकांना 'नो एंट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:28 PM2020-08-13T20:28:19+5:302020-08-13T20:42:23+5:30
स्वातंत्र्य दिन व रविवार अशा दोन सुट्ट्या जुळून आल्याने पर्यटकांची शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
पुणे : लोणावळा शहर आणि परिसर पर्यंटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. परिसरातील भुशी धरण, धबधबे,किल्ले व निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक प्रेक्षणीय स्थळे हे पावसाळ्यात दरवर्षी पर्यटकांना भुरळ घालत असतात. मात्र, यावर्षी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव असल्याने पहिल्यापासूनच लोणावळा शहर प्रशासनाने पर्यंटकांना शहर व परिसरात येण्यास बंदी घातली आहे. परंतु, तरीदेखील काही पर्यटक सरकारी नियमांचे उल्लंघन करून लोणावळा परिसरात भटकंतीसाठी येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी,पोलीस यंत्रणांनी १५ ऑगस्टच्या दिवशी लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येण्यास सक्त मनाई केली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.
पोलिसांची ठिकठिकाणी असणार नाकाबंदी
स्वातंत्र्य दिन व रविवार अशा दोन सुट्ट्या जुळून आल्याने पर्यटकांची शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील खंडाळा, खालापूर टोल नाक्यासह अनेक ठिकाणी पोलीस तपासणी कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यामुळे चुकूनही मौजमजेसाठी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती लोणावळा शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.
लोणावळा शहरात ३१ ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी
शहरात ३१ ऑगस्टपर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली. शहरात कोरोना आजारामुळे झालेल्या मृत्युमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. याकरिता वरील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 15 ऑगस्टपासून लोणावळा शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती दिली.