पुणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आधारकार्ड नाही तर प्रवेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:01 PM2019-06-19T13:01:23+5:302019-06-19T13:04:54+5:30
सध्या सगळ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे.
मनोज गायकवाड
पुणे : नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.ला प्रवेश घ्यायचाय तर विद्यार्थ्याचे आधारकार्ड व बँकेत खाते आहे का, तरच प्रवेश दिला जाईल; अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही. महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून पालकांना अशी उत्तरे मिळत आहेत.
आधारकार्ड केंद्रच उपलब्ध नाहीत.तर आधारकार्ड काढणार तरी कुठे, अशी समस्या पालक सांगत आहेत. आधारकार्ड नाही तर बँकेत खातेही निघत नाही, अशा परिस्थितीत शाळेत प्रवेश कसा घ्यायचा, या समस्येने पालक हतबल झाले आहेत. असा प्रकार मुंढव्यातील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयातील महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळेत घडल्याचे समोर आले आहे. असे अनेक पालक आहेत की ज्यांच्याकडे मुलांचे आधारकार्ड नाही. मग अशा पालकांनी मुलांना शाळेत टाकायचेच नाही का, असा सवाल आता पालक करीत आहेत.
तीन वर्षांची मुलं झाली की पालक त्याला शाळेत घालण्यासाठी शाळांचा शोध सुरू करतात. सध्या सगळ्याच शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू आहे.त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात पालिकेच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली आहे. या प्रवेशादरम्यान मुलांचे आधारकार्ड नसणाऱ्या पालकांना सदर शाळा प्रवेश नाकारत असल्याची तक्रार पालक करीत आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शाळेची भेट घेतली. यात इंग्रजी माध्यम शाळेला मुख्याध्यापकच नसून शाळेतील एका शिक्षिकेलाच प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी दिली आहे. या पदावर अस्मिता शेंडगे या काम पाहत आहेत.
......
आधारकार्ड केंद्रच नाहीत तर प्रवेशासाठी सक्ती कशासाठी?
इंग्रजी माध्यम शाळांमध्ये वयाची ३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रवेश दिला जातो. मुंढवा-केशवनगर भागात नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.साठी अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. त्या शाळांची वार्षिक फी २0 हजार ते ५0 हजार इतपत आहे. ज्यांची आर्थिक कुवत असते असे पालक खासगी शाळेत जाऊन प्रवेश घेतात. परंतु जे पालक मजूरवर्ग, कामगारवर्ग, कंत्राटी कामगारवर्ग असे आहेत, असे पालक महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक असतात.
.......
खासगी शाळांची पाहणी केली तर कुठेही या वर्गांच्या प्रवेशासाठी आधारकार्ड सक्तीचे नाही. परंतु असे असतानाही पुणे महानगरपालिकेच्या शाळेत नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.साठी आधारकार्ड सक्तीचे करून प्रवेश नाकारायचा कायदा आहे का. दोन-तीन वर्षांपूर्वी पाच ते सहा आधारकार्ड केंद्रे अद्ययावत होती. परंतु सद्यस्थितीला मुंढवा-केशवनगरमध्ये एकही केंद्र सुरु नाही. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे आधारकार्ड आठ दिवसांत शाळेला द्यायचे कसे. या अशा अनेक बाबींमुळे पालक त्रस्त झाले आहेत. शाळेतील शिक्षक पालकांशी व्यवस्थित बोलत नसल्याच्याही तक्रारी समोर येत आहेत.
......
आम्हाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आधारकार्ड घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना वरिष्ठांकडून आहेत. मुलांचे आधारकार्ड नाहीत, अशा पालकांना आम्ही आठ दिवसांचा कालावधी देत आहोत. त्या कालावधीत त्यांनी आपल्या पाल्याचे आधारकार्ड काढल्याची पावती शाळेत दाखवली तरच प्रवेश निश्चित केला जाईल.- अस्मिता शेंडगे, प्रभारी मुख्याध्यापिका