राज्याच्या अर्थसंकल्पात नाही अपेक्षित तरतूद ; धनगर समाजात प्रचंड नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:53 PM2021-03-12T17:53:12+5:302021-03-12T17:54:21+5:30
‘राष्ट्रवादी'च्या पदाधिकाऱ्यांचा पक्षालाच घरचा आहेर
बारामती: राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी अपेक्षित तरतुद केलेली नाही. त्यामुळे समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. तरी धनगर समाज राज्य शासनाच्या अर्थसंकल्पाचा निषेध करीत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुका पक्ष निरीक्षक बापुराव सोलनकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला पक्ष निरीक्षक डॉ. अर्चना पाटील या राष्ट्रवादीच्या दोघा पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलनकर आणि डॉ पाटील यांच्याशिवाय समाजाच्यावतीने गणपत देवकाते, डॉ. अर्चना पाटील, संपतराव टकले, बापुराव सोलनकर, वसंतराव घुले, चंद्रकांत वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली. पाठीमागील सरकारने धनगर समाजाला २२ योजनांसाठी १००० कोटींची घोषणा केली होती.मात्र, त्याची तरतुद झाली नाही. शासनाने समाजाबाबत दुजाभाव केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने उद्योजक महामंडळ स्थापन करून उद्योजकांना आर्थिक अनुदान द्यावे, अहिल्यादेवी घरकल योजना केली आहे. ती फक्त भटक्या विमुक्त जाती यांनाच या योजनेचा लाभ मिळावा. अहिल्यादेवी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी. राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजासाठी सरकारी जागेसह सामाजिक सभागृह देण्यात यावे.
राज्यात प्रत्येक तालुक्यात धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जागेसह वस्तीगृह करावे. वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे येथे यशवंतराव होळकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे. मेंढपाळ बांधवांसाठी १ रूपयामध्ये १० लाख रूपयाचा अपघाती व नैसर्गीक अपत्ती विमा व शेळीमेंढीसाठी विमा लागु करावा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
————————————
...त्यावर ‘रयत’ मालकी हक्क कसा काय दाखवते ?
वाफगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे येथे यशवंतराव होळकर यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे.हे शुर राजाचे प्रतिक आहे.त्यावर रयत शिक्षण संस्था मालकी हक्क कसा काय दाखवते,असा सवाल राष्ट्रवादीचे पदाधिकारी बापुराव सोलनकर यांनी केला आहे.