ना आर्थिक मदत, ना दुकाने उघडण्यास परवानगी , ‘कात्रित’ सापडले सलून व्यावसायिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:02+5:302021-06-06T04:09:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सलून व्यावसायिकांना राज्य सरकारने ‘ना कोणती आर्थिक मदत केली आहे, ना दुकाने उघडण्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सलून व्यावसायिकांना राज्य सरकारने ‘ना कोणती आर्थिक मदत केली आहे, ना दुकाने उघडण्यास परवानगी’ दिली आहे. आर्थिक विवंचनेच्या कात्रित सापडलेले सलून व्यावसायिक आता पुरते हतबल झाले आहेत. उपासमारीमुळे आतापर्यंत राज्यात २२ सलून व्यावयासायिकांनी आत्महत्या केली आहे. पुण्यातील १५०० हून अधिक दुकानांना कायमचे टाळे लागण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी लावण्यात आलेला लॉकडाऊन हा नाभिक समाजाच्या मुळावर उठला. परंपरागत हा व्यवसाय असल्याने यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडला अन् सलून व्यावसायिकांच्या तोंडाला ‘फेस’ आला. सोमवारपासून राज्य सरकार अनलॉकची प्रक्रिया सुरू करीत आहे. यात सर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यात सलून दुकानांचा समावेश नाही. तेव्हा सरकारने आता आमचा अंत न पाहता सोमवारपासून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करण्याची हमीदेखील सलून व्यावसायिकांनी दिली.
कोट - १
लॉकडाऊनमुळे शहर व ग्रामीण भागातील समाज बांधवांचे हाल होत आहेत. उत्पन्न शून्य असल्याने बँकांचे हप्ते थटले, वीज बिल, दुकानाचे भाडे, आदी देणे बाकी आहे. राज्य सरकारने इतर व्यावसायिकांना आर्थिक मदत केली अन् आमच्याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला तत्काळ दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.
-भगवानराव बिडवे, अध्यक्ष, राष्ट्रीय नाभिक महासंघ, पुणे.
कोट २
पुणे शहरात जवळपास ४ हजार सलून दुकाने आहेत. पैकी ४० टक्क्यांहून अधिक या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद पडली. हजारो सलून व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करू आम्हाला देखील सोमवारपासून दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी.
- चंद्रशेखर जगताप, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पुणे