Pune Metro: ना इंधन, ना विजेचे खांब; तरीही पुण्यात मेट्रो धावणार
By राजू इनामदार | Published: October 4, 2023 03:59 PM2023-10-04T15:59:12+5:302023-10-04T16:00:12+5:30
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्राेसाठी थर्ड रेल प्रणाली...
पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस असणार आहे. या मेट्रोच्या रुळांमधून तिला वीजपुरवठा हाेणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या डोक्यावर ना विद्युत तारांचे जंजाळ असेल, ना तिच्या रुळांवर विजेचे खांब असतील. त्यामुळे ही मेट्रो पुण्यासाठी एक अनुपम दृश्य ठरणार आहे.
थर्ड रेल प्रणाली असे या नव्या प्रणालीचे नाव आहे. पुण्यात प्रथमच या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यासंबंधीच्या करारावर ठेकेदार कंपनी व राज्य सरकार यांच्यात नुकताच करार झाला असून, या तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारने मान्यता दिली आहे. परदेशात आता सर्व मेट्रो याच तंत्रज्ञानाने धावत असतात, त्यामुळे भारतातही आता याचा वापर करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यातून करण्यात येत आहे.
थर्ड रेल प्रणाली आहे तरी काय?
‘थर्ड रेल सिस्टिम’ला लाइव्ह रेल, इलेक्ट्रिक रेल किंवा कंडक्टर रेल असेही म्हटले जाते. ही एक अर्ध-सतत कंडक्टरद्वारे ट्रेनला विद्युत पुरवठा करण्याची अत्याधुनिक पद्धत आहे, जी नेहमीच्या रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनच्या बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा प्रदान केला जातो. ही प्रणाली जगभरात मेट्रो गाड्यांना विद्युत पुरवठ्यासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी सिद्ध झालेली आहे.
असे चालते काम
‘थर्ड रेल’ प्रणालीमध्ये मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या (ट्रॅकच्या) समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकून, त्या मेट्रो गाडीला थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, जिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा दिला जातो.
अशी आहे रचना-
- हिंजवडीतील आयटी हबला थेट शिवाजीनगर म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागाला जोडले जाणार आहे.
- शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत २३ किलोमीटर अंतराचा हा उन्नत मार्ग आहे.
- यात एकूण २३ स्थानके असतील.
- पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या नियंत्रणात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर खासगी कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे.
- काम पूर्ण झाल्यावर पुढील ३५ वर्षे याच कंपनीला ही मेट्रो चालविण्यासाठी देण्याचा करार करण्यात आला आहे. सध्या या मेट्रोचे काम गतीने सुरू आहे.
यात मेट्रो ट्रेनच्या बाजूला किंवा डोक्यावर खांब तसेच विद्युतवाहक तारा नसतात. त्यामुळे विनावायर इतक्या उंचांवरून धावणाऱ्या मेट्रोचे सौंदर्य खुलते. त्याहीपेक्षा मोठा फायदा म्हणजे पक्षी किंवा पतंग अपघाताने तारांमध्ये अडकून मेट्रोच्या विद्युत पुरवठ्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्याला या प्रणालीत वाव राहत नाही. पुणे शहराच्या सौंदर्यात शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे भर पडणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
- आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड