शुल्क न भरल्याने परीक्षा देण्यास मनाई; धानोरीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 07:06 PM2020-03-07T19:06:48+5:302020-03-07T19:08:37+5:30
शुल्कवसुलीसाठी शाळा प्रशासनाने काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना वार्षिक परीक्षेस बसू न देता उन्हात उभे केले.
विशाल थोरात -
धानोरी : पुुणे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा लढा उभारला. मात्र आजच्या आधुनिक युगात केवळ शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेस बसू न देण्याची घटना घडली आहे. धानोरीतील ‘गोकुलम स्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेच्या व्यवस्थापनावर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी पालक करीत आहेत.
विद्यालयाची पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहे. मात्र काही गरीब घरातील विद्यार्थी व पालकांना आर्थिक विवंचनेमुळे शैक्षणिक शुल्क देता आलेले नाही. शुल्कवसुलीसाठी शाळा प्रशासनाने काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना वार्षिक परीक्षेस बसू न देता चक्क उन्हात उभे केले. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी विद्यालयात धाव घेतली. काही पालकांनी अंशत: शुल्क भरण्याची तयारी दाखवली. मात्र विद्यालयाने पूर्ण शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा शेवटपर्यंत पवित्रा घेतला. यामुळे पालक व विद्यालय व्यवस्थापनात बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करून विद्यार्थ्यांना परीक्षेस न बसू देता, या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाºया या विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. तसेच या विद्यालयाचे शुल्क न भरल्याने काही विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेतही हजर राहू न दिल्याने त्यांची शाळेतील हजेरी कमी लागली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेवर कारवाई न झाल्यास पालक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
आमच्या विद्यालयात सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात, यापैकी सुमारे दीडशे विद्यार्थी नियमित शुल्क भरतात. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी सुमारे १२० विद्यार्थी ‘आरटीई’अंतर्गत असून त्यांचे मागील ३-४ वर्षांचे शुल्क शासनाने आम्हाला दिलेले नाही. विद्यार्थी व पालकांना अनेक वेळा विनंती करूनही शुल्क जमा करण्यात हयगय केली जाते. शुल्क बाकी असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेस बसता यावे, म्हणून त्यांची अडवणूक न करता ‘हॉल तिकीट’ दिली आहेत. काही विद्यार्थी वर्षभर शाळेत उपस्थित न राहता, केवळ परीक्षेच्या वेळी शाळेत येतात, ही पण मोठी समस्या आहे. एका-एका विद्यार्थ्याचे लाखात शुल्क बाकी आहे, तरीही पालक अतिशय बेजबाबदार वागत आहेत.- वासुकी, प्राचार्या.
हातापाया पडूनही ऐकलं नाही!
एका महिलेने सांगितले, की माझ्या २ मुली या शाळेत शिकत आहेत. माझ्याकडून या शाळेचे काही प्रमाणात शुल्क थकले आहे. एक मुलगी तिसरीत व मोठी मुलगी सातवीत आहे. शुल्क थकल्याने प्राचार्यांना अक्षरश: हातापाया पडून मुदत देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी अजिबात दयामाया न दाखवता मुलीला तिसरीच्या परीक्षेस बसू दिले नाही. यामुळे मुलीला पुन्हा तिसरीच्याच वर्गात बसावे लागत असल्याने तिची मानसिक परिस्थिती बिघडली आहे. तसेच मुलीला दुसºया शाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखला देण्याची मागणीही धुडकावून लावण्यात आली.