पुण्यात गेल्या पाच वर्षांत उष्माघाताची नाही एकही नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:54+5:302021-05-20T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात देखील सरासरी तापमान उष्माघाताचे बळी जातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे जिल्ह्यात उन्हाळ्यात देखील सरासरी तापमान उष्माघाताचे बळी जातील एवढे फारसे वाढत नाही. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात उष्माघाताने बळी गेल्याची एकही नोंद नाही. यंदा देखील केवळ एप्रिल महिन्यात दोन दिवस सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले होते.
यंदा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. रुग्ण संख्या वाढत असल्याने 15 एप्रिल पासूनच जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली. त्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात झाली. परंतु यंदा केवळ दोन दिवसच जिल्ह्याचे सरासरी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले. त्या लाॅकडाऊन व कोरोनाची धास्तीने लोक घराबाहेर पडलेच नाही. पुणे जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात सरासरी तापमान थोडे अधिक असले तरी उष्माघात होण्याएवढे मात्र वाढत नाही. राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत पुण्याचा उन्हाळा थोडा सुखदच असतो. यामुळेच गेल्या पाच वर्षांत तरी जिल्ह्यात उष्माघाताची एकही नोंद नाही.
जिल्ह्यात एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान तापमान साधारणपणे 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. यंदा एप्रिल महिन्यात दोन दिवस तापमानाने चाळिशी ओलांडली, मात्र त्याची तीव्रता जाणवली नाही.
यंदा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशाने अधिक होते. 39 अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान होते. या वर्षी च्या हंगामात 2 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस च्या वर गेले होते. तर सध्या चक्रीवादळामुळे कमाल व किमान तापमानात चांगली च घट झाली आहे. 18 मे रोजी पुण्यातील कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस इतके होते. ते सरासरीपेक्षा 5.1 अंश सेल्सिअस ने कमी झाले आहे.
-----
उष्माघाताचे बळी
२०१९ - 00
२०२० - 00
२०२१ - 00
------
जिल्ह्यात यंदा उन्हाचे चटके कमीच
जिल्ह्यात एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ झाली होती. सरासरी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान वाढले होते. परंतु दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा जरा थंडच होता. त्यात कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे लोक घराबाहेरच पडले नाहीत, त्यामुळेच उन्हाचे चटकेदेखील जाणवले नाहीत.
-----
जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांत उष्माघाताची एकही नोंद नाही. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील सरासरी तापमान फारसे वाढत नाही. एप्रिल-मे महिन्यात सरासरी तापमान 38-40 दरम्यानच असते. यंदा तर उन्हाळा फारसा जाणवला देखील नाही.
- डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी