"हेका-फिका नाही, सगेसोयरे शब्द त्या दोन जणांनी घेतला"; जरांगे पाटलांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:42 PM2024-01-24T13:42:42+5:302024-01-24T14:37:10+5:30
राज्यात कुणबी नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात आल्याने २० जानेवारी रोजी त्यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे आपला मोर्चा वळवला. जरांगे आज पहाटे पुण्याच्या वेशीवर पोहोचल्यानंतर पुणे जिल्ह्यात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाकडून त्यांची समजूत काढण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मात्र, जरांगे पाटील मुंबईतील उपोषणावर ठाम असून २६ जानेवारी रोजी ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, सगेसोयरे शब्दावरुन कायदेशीर पेच असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यात कुणबी नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यांच्या रक्तनात्यातील नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र वाटावे तरच मराठाआरक्षणाचा हा आकडा वाढणार आहे. प्रमाणपत्रच वाटप झाले नाही तर अध्यादेशातील बदलांना अर्थच राहणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यातच, सगेसोयरे या शब्दावरही ते ठाम आहेत. त्यावरुन, त्यांच्यावर हेकेखोरपणा आणि कायदेशीर बाबींना जुमानत नसल्याची टीका होत आहे. याच अनुषंगाने जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सगसोयरे हा शब्द कायद्याच्या तरतूदीत बसत नाही, याशिवाय तुम्ही सातत्याने मागण्या बदलत आहात, असे जरांगेंना विचारले असता हा शब्द आम्ही दिला नसून दोन न्यायाधीशांनी दिलेला आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
तसेच, ''कोणती मागणी केली ते समोर येऊन सांगावं, नवीन मागणी आम्ही कोणती केली. आमचा कुठलाही हेका-फिका नाही. आमचा, सगेसोयरे शब्द हा जजने घेतला आहे, ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे, न्याय मंदिरात जे सगळ्यांना न्याय देतात, त्या दोन न्यायाधीशांनी हा शब्द घेतलेला आहे,'' असे स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिले.
अशी आहे सगसोयरेची व्याख्या
सगे सोयरे या शब्दाची व्याख्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी आहे, असे म्हणत जरांगे यांनी ही व्याख्याच सांगितली. ''मराठा समाजात पिढ्यान-पिढ्या परंपरेनुसार गणगोतात, लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात, गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात, त्या त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्या नोदींच्याच आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,'' अशी सोयऱ्याची व्याख्या आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, सरकारने आमची ही व्याख्या घेतली नाही. त्यात, फक्त पितृसत्ताक टाकलं, मग आम्ही म्हटलं मातृसत्ताकही टाका. आम्ही जे सांगत नाहीत ते त्यात उलटं टाकतात, असंही जरांगे यांनी म्हटले.