घराची नोंद नव्हती म्हणून मिळाले नाही घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:09+5:302021-07-28T04:11:09+5:30
घोडेगाव : माळीणमध्ये घर बांधले. मात्र, घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नव्हती. ३० जुलै रोजी डोंगराने अख्ख गाव गिळंकृत केले. ...
घोडेगाव : माळीणमध्ये घर बांधले. मात्र, घराची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात नव्हती. ३० जुलै रोजी डोंगराने अख्ख गाव गिळंकृत केले. या दुर्घटनेत ४४ कुटुंबांतील १५१ लोक दगावले. ९ जण वाचले तर ३८ लोक बाहेरगवी असल्याने बचावले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. नव्या गावात सर्वांना घरे दिली. मात्र, आमच्या घराची ग्रामपंचायत नोंद नसल्याने आम्हाला घरे मिळाली नाही. गेल्या सात वर्षांपासून आम्ही आमची कैफीयत शासनापुढे मांडतो आहोत. मात्र, अद्यापही आमच्या मागणीची दखल न घेतल्याने आम्हाला पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत असल्याची खंत अजूनही निवारा शेडमध्ये वास्तव्यास असलेल्या कमलबाई लेंभे व भीमराव झांजरे यांनी लोकमतकडे व्यक्त केली.
निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी ७ वर्ष पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी माळीण फाट्यावर पत्र्याचे निवारा शेड बांधून तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आघाणे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे ६८ घरे बांधण्यात आली. १ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नव्या गावाचा लोकार्पण सोहळा झाला. लोकांना नवीन घरे देण्यात आली.
मात्र, या नवीन गावात घर मिळाले नाही, अशी तक्रार कमलबाई लेंभे व भीमराव मारुती झांजरे या कुटुंबाने मांडली आहे. कमलबाई लेंभे त्यांचे माळीणमध्ये सामाईक घरे होते. दुर्घटनेच्या काही दिवस आधीच नवे घर बांधून पूर्ण झाले होते. यामुळे या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले. मात्र त्यांच्या घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही. त्यामुळे त्या अजूनही पत्र्याच्या शेडमध्येच राहतात. भीमराव झांजरे यांचे जुन्या माळीणमध्ये दुर्घटनेच्या दोन वर्षांआधी घर बांधून पूर्ण झाले होते. मात्र, घरांच्या नोंद घालणे बंद झाल्याने त्यांची नोंद झाली नाही. घराची नोंद नसल्याने त्यांना घर मिळाले नाही. घराच्या घरपट्टया त्यांनी भरल्या. त्या पट्टया पण त्यांच्याकडे आहेत. तरीही नवीन गावात त्यांना घर मिळाल्याने नाही. घरासाठी आजही ते शासन दरबारी चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
चौकट
न्यायाची प्रतीक्षा
सगळं गाव नवीन गावठाणात रहायला गेले. मात्र, ही दोन्ही कुटुंबे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत पत्र्याच्या शेडमध्ये रहात आहेत. ही शेड मोडल्यानंतर दोन्ही कुटुंबे बेघर होणार आहेत. पत्र्याची शेड मोडण्यापूर्वी या दोन्ही कुटुंबांना घर मिळावे, अशी मागणी गोविंद झांजरे, शिवाजी लेंभे या ग्रामस्थांनी केली आहे.
माळीण गावचे पुनर्वसन होऊनही जुन्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी कुटुंब.