तक्रार पुस्तिकेची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:55 AM2018-04-10T00:55:23+5:302018-04-10T00:55:23+5:30

पेट्रोल कमी भरले जाणे, हवा भरण्यासाठी पैैसे घेणे, पेट्रोल मोजून देण्यास नकार अशा विविध कारणांवरून शहरातील पेट्रोल पंपांवर ग्राहक आणि कर्मचारी यांचे सातत्याने वाद होत असतात.

No information about the complaint book | तक्रार पुस्तिकेची माहितीच नाही

तक्रार पुस्तिकेची माहितीच नाही

googlenewsNext

- प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : पेट्रोल कमी भरले जाणे, हवा भरण्यासाठी पैैसे घेणे, पेट्रोल मोजून देण्यास नकार अशा विविध कारणांवरून शहरातील पेट्रोल पंपांवर ग्राहक आणि कर्मचारी यांचे सातत्याने वाद होत असतात. पेट्रोल पंपावरील कोणत्याही स्वरूपाची तक्रार नोंदवण्यासाठी कंपनीतर्फे तक्रार पुस्तिका दिली जाते. पेट्रोल पंप एजन्सी देताना कंपनी व चालक यांच्यात करार होत असतो. त्यात ग्राहकांना द्यायच्या विविध सुविधांचे कलम असते. असुविधांचा सामना करावा लागल्यास ग्राहकांना तक्रार पुस्तिकेमध्ये नोंद करता येते. तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करता येतो. मात्र, बरेचदा याबाबत ग्राहक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.
पेट्रोल कंपनीतर्फे प्रत्येक पेट्रोल पंपाकडे तक्रार पुस्तिका दिली जाते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असल्यास या पुस्तिकेमध्ये आपले नाव, संपर्क क्रमांक, तक्रारीचे स्वरूप, दिनांक, तक्रार निवारण किती झाले की नाही, झाले असल्यास किती दिवसांत अशा स्वरूपाची माहिती लिहिण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. सेल्स आॅफिसरतर्फे दर एक-दोन महिन्यांनी या पुस्तिकेचे लेखापरीक्षण केले जाते. मात्र, बरेचदा पेट्रोलपंप चालकांकडून या सुविधेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्राहकांना या सुविधेबाबत काहीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले. पेट्रोल पंपावर सेल्स आॅफिसरचे नाव आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागावर लावलेला असतो. त्या क्रमांकावर संपर्क साधूनही आपली तक्रार नोंदवता येऊ शकते.
एक ग्राहक पेट्रोल भरुन झाल्यावर हवा भरण्यासाठी जातो. हवा भरुन झाल्यावर
मुलगा : साहेब पाच रुपये द्या.
ग्राहक : येथे हवा मोफत भरुन दिली जाते ना? मग पैैसे कसले?
मुलगा : टीप द्या साहेब.
ग्राहक : परवानगी नसताना पैैसे मागितलेस तर पुस्तिकेमध्ये तुझी तक्रार नोंदवेन.
मुलगा : कसली पुस्तिका? अशी कोणतीही सोय इथे नाही.
महिला : मी ३५० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले होते. तुम्ही ३०० रुपयांचेच भरले आहे.
कर्मचारी : मॅडम, मी व्यवस्थित पेट्रोल भरले आहे. तुम्ही काटा नीट पाहिला नाही.
महिला : मला खात्री आहे की तुम्ही पेट्रोल पूर्ण भरलेले नाही. मला मोजून हवे आहे.
कर्मचारी : मॅडम मागे मोठी रांग लागली आहे, तुम्ही पुढे व्हा, हुज्जत घालू नका.
महिला : पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी येथून हलणार नाही. मला तक्रार नोंदवायची आहे तक्रार पुस्तिका द्या.
कर्मचारी : कसली पुस्तिका? तुम्ही मॅनेजरशी बोला.
कंपनीने प्रत्येक पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिलेली असते. यामध्ये तक्रार नोंदवण्याचा, तक्रार निवारणासाठी पाठपुरावा करण्याचा ग्राहकांना पूर्ण अधिकार असतो. कोणत्याही चालकाने पुस्तिकेबाबत उदासीनता दाखवल्यास कंपनीकडे अथवा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवता येऊ शकते.
- पेट्रोल पंपचालक
पेट्रोलियम डीलर असोसिएशनतर्फे ग्राहकांना पेट्रोल पंपावरील असुविधांबाबत तक्रार नोंदवता येते. ग्राहकांना प्रथम व्यवस्थापकाशी संपर्क साधता येतो. व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पेट्रोल पंपाच्या मालकाकडे तक्रार नोंदवता येते. यानंतरही ग्राहकाचे समाधान न झाल्यास ग्राहकांना लेखी तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिली जाते. आॅईल कंपनीकडून समस्येचे निराकरण न झाल्यास ग्राहक सेल्स आॅफिसरशी संपर्क साधून पाठपुरावा करु शकतात. ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी असोसिएशन कायमच कटिबद्ध आहे.
- सुमीत धुमाळ, अध्यक्ष, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, पुणे.
>हवा भरण्यासाठी पैसे....
अनेक पेट्रोल पंपांवरील मुले हवा भरण्यासाठी पैशांची मागणी करतात. प्रत्यक्षात, हवेच्या मशीनजवळ ‘नो टिप्स प्लीज’ असे लिहिलेले असते. तरीही पैसे मागितले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून नोंदवली जाते. याबाबत मॅनेजरशी बोलून तोडगा काढता येऊ शकतो.
मी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले असता, पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची शंका आली. याबाबत मी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने मॅनेजरशी बोलण्यास सांगितले. मॅनेजरने आमच्या पंपावर भेसळ होत नसल्याने ठामपणे सांगितले. त्या वेळी पेट्रोल पंपावरील पुस्तिकेबाबत मला माहीत नव्हते. सेल्स आॅफिसरबाबतही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे तक्रार नोंदवता आली नाही. - स्वाती पिंगळे, ग्राहक

Web Title: No information about the complaint book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.