अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 08:18 PM2020-02-02T20:18:00+5:302020-02-02T20:22:59+5:30
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले.
पुणे : महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी अन्याय झालेला नाही. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालाही मिळणार आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार नाही म्हणून अन्याय करण्याची भुमिका अजिबात नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना आठवले यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. आरपीआय आठवले गटाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागण्या आम्हाला द्याव्यात, त्यांच्या मागण्या नक्की पुर्ण करू. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षामध्ये असल्याने विरोध करत आहेत. शेतकऱ्यांना ताकद देण्याची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात येण्याच्या मुद्दयावर ते म्हणाले की, या घटनेमागे कोणाचा हात होता, हे पाहण्यासाठी ‘एनआयए’कडे तपास दिला आहे. एल्गार परिषदेमध्ये खरोखर कोणी नक्षलवादी होते का, हा तपास पोलिस करत आहेत. केंद्र सरकारने जो ‘एनआयए’कडून तपास सुरू केला आहे, त्यांना तो अधिकार आहे. पोलिसांनी सहा-सात जण नक्षलवादी आहेत, असे पुरावे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यामुळे ज्यांना तपास करायचा असेल त्यांनी तो करावा. पण परिषदेमध्ये भाषणे झाली म्हणून कोरेगाव भिमा येथे दंगल झाली, या पुणे पोलिसांच्या भुमिकेशी मी सहमत नाही. वढू गावात झालेल्या संघर्षातून हा प्रकार घडला होता, असे आठवले यांनी स्पष्ट केले.