साखर कारखानदारीवर ‘नो केन’चे संकट
By admin | Published: January 5, 2017 03:30 AM2017-01-05T03:30:27+5:302017-01-05T03:30:27+5:30
ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.
केडगाव : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जेमतेम २ महिने झाले असताना जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यावर ‘नो केन’ म्हणजे गाळपासाठी अपुऱ्या उसाचे संकट ओढवले आहे.
नो केन संकटामुळे नववर्षाच्या सुरुवातीस नीरा भीमा, व्यंकटेश व अनुराज हे कारखाने बंद झाले आहेत. काही कारखाने पुरेशा उसाअभावी दिवसभरातील बहुतांशी तास बंद राहत आहेत. गेल्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी ऊसपिक जळाले होते. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी कोवळ्या उसाचे पाणीटंचाईमुळे गाळप केले. त्यामुळे या गळीत हंगामावर ऊसटंचाईचे सावट होते. भरीस भर राज्यसरकारने या वर्षी गळीत हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे असताना जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरच्या सुरुवातीस गळीत हंगाम सुरू झाला. अपुऱ्या उसाअभावी साखर कारखानदारांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील उसांची पळवापळवी सुरू केली. चांगल्या ऊसदराचे आमिष दाखवून बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांच्या टोळ्या पुणे जिल्ह्यात दाखल झाल्या. परंतु पुरेशा उसाअभावी जेमतेम ५० ते ६० दिवसांच्या हंगामानंतर कारखाने बंद झाले आहेत. याशिवाय कारखान्याचा सरासरी २५०० रुपये पहिला हप्ता किंवा बाजारभाव असताना स्थानिक गुऱ्हाळे प्रतिटन ३००० रुपये देऊन कारखान्यांशी स्पर्धा करीत आहेत. गुऱ्हाळ असणाऱ्या परिसरात काही ठिकाणी कृत्रिम ऊसटंचाई जाणवत आहे. प्रतिवर्षी सरासरी १५० दिवस चालणारा गळीत हंगाम यावर्षी ६० दिवसांत घरघरीस लागला आहे.
सध्या जिल्ह्यातील बारामती अॅग्रो, दौंड शुगर्स, इंदापूर, नाथ म्हस्कोबा हे कारखाने सरासरी गाळप क्षमतेच्या निम्मेच गाळप करत असल्याने आठवड्याभरात ते कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे. भीमा पाटस प्रशासनाने पुरेशा उसाअभावी कारखाना सुरू केला नाही, तर राजगड कारखान्याने अवघे ५७ हजार टन गाळप झाले आहे. जिल्ह्यामध्ये अंबालिका, सोमेश्वर, दौंड शुगर्स व इंदापूर कारखान्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ३ लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. बाकीचे कारखाने २ लाख टनाच्या आतच गाळप केलेले आहेत. सोमेश्वर कारखान्याने सर्वाधिक ११.१६ उच्चांकी साखर उतारा मिळवला आहे, तर नीरा भीमा कारखान्याचा उतारा नीचांकी ९.४७ घसरला आहे. त्यामुळे यावर्षी चांगला बाजारभाव मिळाला तरी एकरी सरासरी उत्पन्न घटले आहे.