लॉकडाऊन नाही, पण पुण्यात पुन्हा कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:18 AM2021-02-18T04:18:48+5:302021-02-18T04:18:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्च २०२० मध्ये पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या एवढ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्च २०२० मध्ये पुण्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर अल्पावधीतच कोरोना रुग्णांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढली की पुणे देशातला ‘हॉटस्पॉट’ बनला. पुन्हा तशीच स्थिती पुण्यावर ओढवू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लादला जाण्याची शक्यता तूर्त नसली तरी सूक्ष्म ‘कंटेन्मेंट झोन’ जाहीर होण्याच्या दिशेने प्रशासन विचार करत आहे.
“गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून तेराशेच्या आसपास असलेली सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्णसंख्या आता सतराशेवर गेली आहे. ‘पॉझिटिव्हिटी’ दरही ४.६ टक्क्यांवरून थेट १२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे मास्क न घालणाऱ्यांवर तसेच सुरक्षित अंतराचा नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,” अशी सूचना पोलीस प्रशासनाला देणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले़
पुण्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता महापौरांनी फेटाळली. ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) जाहीर केले जाऊ शकते. यात सिंहगड रस्ता, नगर रस्ता, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसराचा प्रामुख्याने समावेश असू शकतो.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी बुधवारी (दि. १७) आढावा बैठक आयोजित केली होती. उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
चौकट
शारीरिक अंतराला नाही पर्याय
“ससून रुग्णालयासह पालिकेच्या रुग्णालयात १ हजार १६३ खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची साथ अजून संपली नसल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत,” असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.
चौकट
‘स्वॅब कलेक्शन’ वाढवणार
कोरोना चाचणीसाठी सध्या शहरात १७ ठिकाणी स्वॅब सेंटर सुरू आहेत. येथे दिवसाला तीन-साडेतीन हजार चाचण्या होतात. सध्या ज्या चार क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात नव्याने रूग्ण आढळून येत आहेत, तेथे आणखी स्वॅब कलेक्शन सेंटर वाढविण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.