माझ्या हातात जादूची कांडी नाही आणि मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नाही....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 12:03 PM2019-09-21T12:03:33+5:302019-09-21T12:09:23+5:30
परिस्थितीला मुकाट्याने सामोरे जाऊन अंत करून घेण्यापेक्षा संघटितपणे अन्यायाविरुद्ध उभे राहू..
पुणे : प्रजा लोकशाही परिषदेच्या माध्यमातून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आयोजिलेल्या कार्यकर्ता मेळाव्याचा प्रारंभीच्या उपस्थितीमुळे फज्जा उडाला़. सकाळी अकरा वाजताचा हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता गर्दी जमल्यावर सुरू करणे आयोजकांना भाग पडले़. त्यातच साडेतीन वाजता सभागृह खाली करायचे असल्याने मिळालेल्या जेमतेम वेळेत राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून, उपेक्षित-वंचित घटकांना एकत्र घेऊन आपण एक मजबूत वीण बांधली पाहिजे, असे आवाहन केले़.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होेत़े़. शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यातील प्रमुख अतिथींनी मात्र यावेळी पाठ फिरवली़. दरम्यान, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष कल्याण दळे, गोर सेनेचे संदेश चव्हाण, प्रजा सुरक्षा पक्षाचे अध्यक्ष दशरथ राऊत आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला़. दुपारी एकच्या सुमारास लक्झरी बसमधून आलेल्या गोर सेनेच्या कार्यकर्त्यांची संख्या सभागृहात लक्षणीय होती़. गोर सेनेच्या प्रमुखांचे भाषण होताच हे कार्यकर्ते सभागृह खाली करू लागले़. मात्र, सभागृहातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले़ या घडामोडीत दुपारी सव्वातीनच्या सुमारास मार्गदर्शन करण्याकरिता शेट्टी उभे राहिले़ माझ्या हातात जादूची कांडी नाही व मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नसल्याचे सांगून, परिस्थितीला मुकाट्याने सामोरे जाऊन अंत करून घेण्यापेक्षा संघटितपणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे आवाहन केले़. उपद्रव मूल्ये ज्यांकडे आहेत त्यांचे प्रश्न काही अंशी सुटतात, असे सांगून त्यांनी, आजची राजकीय परिस्थिती अस्थिर झाली असून, प्रस्थापितांचा वरवंटा सध्या सर्वत्र फिरत असल्याचे सांगितले़. अशावेळी आपल्या हाताला जे लागेल ते आपण मिळवूच, पण सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात आपली ताकद मुंबईला जाऊन दाखवून देऊ, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.