काहीही झाले तरी विमानतळ होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:35+5:302021-07-04T04:08:35+5:30

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नव्याने होऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, ...

No matter what happens, the airport will not be allowed to happen | काहीही झाले तरी विमानतळ होऊ देणार नाही

काहीही झाले तरी विमानतळ होऊ देणार नाही

Next

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नव्याने होऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, हे विमानतळ होऊ नये म्हणून विमानतळविरोधी संघर्ष समितीने दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडे धाव घेऊन विमानतळ नको असल्याचे निवेदन दिले.

पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष समितीने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर विमानतळ झाल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील, यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यानंतर कुल यांना विमानतळविरोधी निवेदन दिले. पुरंदरचे आमदार यांनी विमानतळ बाधित गावांतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त, मुख्य कार्यकारी आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, जिल्हाधिकारी पुणे यांना पुरंदरच्या पूर्व भागातील रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, राजुरी, मावडी पिंपरी व बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी या गावांचा आंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणूण सुचवलेली आहे. तशा बातम्यादेखील प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु या भागातील रहिवासी मूळ शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे या भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई शिरसाई जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने येथील भाग ८० टक्के बागायती झाला आहे. त्याचप्रमाणे या भागात डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर इत्यादी फळबागा मोठ्या प्रमाणात आहे. येथे उसाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या भागाचे कांदा हे मुख्य पीक आहे. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळी केलेली आहे. त्याचबरोबर दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, मत्सव्यवसाय हे जोडधंदे आहेत. या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. नोकरी व व्यवसाय करणारे कमी आहे.

शासनाने जर बळजबरीने विमानतळ केल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील. तसेच नवीन सुचवलेल्या जागेपासून काही अंतरावर मयुरेश्वर अभयारण्य आहे. यामुळे विमानतळ झाल्यास प्राण्यांच्या नैसर्गिक आधिवासास धोका निर्माण होऊन वन्यजीव विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात काहीही झाले तरी विमानतळ नको, अशी येथील शेतकऱ्यांची भूमिका आहे.

याबाबत कुल म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या शेतकरी विरोधाची संपूर्ण माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून विमानतळ बाधित शेतकऱ्यांना मदत करू. या वेळी पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, अंकुश भगत, शशीभाऊ गायकवाड, बाळासाहेब कड, संतोष कोलते, चंद्रकांत चौंडकर, सदाशिव चौंडकर, आनंद चौंडकर, नारायण चौंडकर, योगेश घाटे, महेंद्र खेसे, महेश कड इत्यादी उपस्थित होते.

कोट

पुरंदर विमानतळ झाल्यास पुरंदरचा शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी शासनाने या ठिकाणी विमानतळ करू नये. विमानतळसंदर्भात लवकरच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून काहीही झाले तरी विमानतळ करू नका, अशी विनंती करणार आहे.

- गणेश मुळीक, अध्यक्ष, पुरंदर विमानतळ संघर्ष समिती

फोटो ओळ - पुरंदर विमानतळ संघर्ष समितीने आमदार राहुल कुल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Web Title: No matter what happens, the airport will not be allowed to happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.