संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही : कीर्ती शिलेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 04:30 PM2018-04-20T16:30:56+5:302018-04-20T16:30:56+5:30
आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी आहे.
पुणे : नव्या दमाच्या गायक, कलाकार मंडळींना आपले पूर्वसुरीचे नाट्यसंगीताचे संचित जपण्याची आस नाही. ते जपावे यासाठी ती प्रयत्नशील असल्याचे वाटत नाही. आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी असून संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असे परखड मत संगीत नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मसाप गप्पा या कार्यक्रमात शिलेदार यांच्याशी अभिनेते व नाट्यअभ्यासक सुरेश साखोळकर यांनी संवाद साधला. शिलेदार यांनी आपल्या संगीत नाट्यप्रवासाबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी सध्याच्या मनोरंजनाचा भडिमार, रसिकांचा घसरत चाललेला दर्जा यावरही आपले रोखठोक मते व्यक्त केली. त्या म्हणाल्या, तरुण कलाकारांचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यांना आपण ज्या कलामाध्यमांत काम करतो त्याचा ध्यास लागत नाही. एकाचवेळी अनेक कामे करण्याची घाई त्यामुळे त्या कलाकाराकडून काय अपेक्षा करणार?, आमच्यावेळी आयुष्यपणाला लावून काम करणारे कलाकार होते. कलेप्रती त्यांनी घेतलेला ध्यास त्यांच्या कामातून दिसून यायचा. आता तसे होत नाही. परंपरा आणि नाविन्य यांचा मिलाफ झाल्यास रसिक तुमच्या कलेचा आस्वाद घेण्यास येतील. आताच्या नवीन कलाकारांना भाषा, तिचा योग्य वापर, याबद्द्ल विशेष आनंद नसल्याचे दिसून येते. अण्णासाहेब किर्लोस्कार, गोविंद बल्लाळ देवल, काका खाडिलकर आणि राम गणेश गडकरी यासारख्या भाषाप्रभुंच्या नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. त्या नाटकांमधील शुध्द मराठी भाषा हे आपल्या भाषेची श्रीमंती म्हणावी लागेल. मात्र नवीन कलाकारांनी ही भाषा झेपत नाही.
संगीतनाट्याविषयी काय बोलावे? असा प्रश्न पडतो. आताचा काळ विचित्र करमणुकीचा आहे. त्यातून रसिकांची बहुश्रृतता कमी झाली आहे. ज्यापध्दतीने एखाद्या श्वापदाला मारण्याअगोदर घायाळ केले जाते तसे रसिक मनोरंजनाच्या भडिमारामुळे मृतावस्थेत जात आहे. संगीत नाट्य सुरु राहावे यासाठी रसिकांनी संगीत नाट्याच्या बैठक आयोजित करायला हव्यात. घरात आपल्यावर टीव्हीच्या माध्यमातून ज्यापध्दतीच्या मनोरंजनाचा भडिमार होतो आहे त्याकडे पाठ फिरवून संगीत नाटकांच्या बैठका सुरु झाल्यास भारतीय नाट्य संगीत परंपरा मुळपदावर येईल.