उपचारासाठी पैसे नाहीत? तर 'असा' करा अर्ज अन् मिळवा तीन लाखांपर्यंत मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:23 AM2022-12-19T10:23:05+5:302022-12-19T10:29:05+5:30
तीन लाखांपर्यंत मिळते मदत...
पुणे : महाविकास आघाडी सरकारने बंद केलेला मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष पुन्हा सुरू केला आहे. यात गरजूंना उपचारासाठी तीन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे ते या कक्षाकडे अर्ज करून थेट मदत मिळवू शकतात.
मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाकडून कोणाला मिळते मदत?
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, चॅरिटी हॉस्पिटल आणि राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मदत मिळते. राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसाहाय्य दिले जाते.
तीन लाखांपर्यंत मिळते मदत
या कक्षाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांच्याकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसाहाय्याची शिफारस केल्यास त्या रकमेच्या ५० टक्के रक्कम देण्यात येते. ही मदत मग २५ हजारांपासून ३ लाखांपर्यंत असते.
कोणकोणत्या उपचारासाठी हाेईल लाभ
हृदयदरोग, मेंदुरोग, नवजात बालके, मूत्रपिंड प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, डायलिसिस, हृदयप्रत्यारोपण व बाेन मॅराे ट्रान्सप्लांट यासह विविध गंभीर आजारांसाठी मदत मिळते. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च एक लाखाच्या वरील असल्यास) शासकीय रुग्णालयातील अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
आता ऑनलाइन करा अर्ज
रुग्णांना mahacmmrf.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतो. यात वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालय असून, सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसल्याबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे. लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तहसीलदारांनी प्रमाणित केलेला एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला असावा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र, बँक खाते क्रमांक व इतर तपशील हवा.
रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीद्वारे त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत मिळते. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येताे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही मदत प्रत्येक रुग्णास ३ वर्षांतून एकदा देण्यात येते.
- डाॅ. राेहित बाेरकर, अहिल्या आराेग्य हेल्पलाइन