रक्कम नाही मानपत्र मिळणार, हेही नसे थोडके! महानगरपालिकेकडून २६ जून रोजी बालगंधर्व पुरस्कारापासून नांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:57 AM2018-06-04T05:57:34+5:302018-06-04T05:57:34+5:30
पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पुरस्कारांची रक्कम सुरू करणे तूर्तास शक्य नसले तरी मानपत्र देऊन पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पुरस्कारांची रक्कम सुरू करणे तूर्तास शक्य नसले तरी मानपत्र देऊन पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. येत्या २६ जूनला बालगंधर्व पुरस्कारापासून या निर्णयाची नांदी होणार आहे. पुरस्काराच्या रकमेपेक्षा कलाकाराचा सन्मान महत्त्वाचा असल्याने महापालिकेचा हा निर्णय म्हणजे ‘हेही नसे थोडके’ अशा स्वरूपाच्या भावना सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत. मानपत्र अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
महानगरपालिकेतर्फे वर्षभरात विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. यामध्ये बालगंधर्व, स्वरभास्कर, पठ्ठे बापूराव, संत जगनाडे महाराज, बसवेश्वर, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा विविध ११ पुरस्कारांचा समावेश आहे. सांस्कृतिक महोत्सवांवर होणारी उधळपट्टी रोखावी, या निकालाचा संदर्भ देत राज्य सरकारने अध्यादेश काढून, महोत्सवांवरील उधळपट्टी रोखण्याचे आदेश महापालिकांना दिले होते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. सवंग, असांस्कृतिक प्रकारांवर खर्च करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कारांचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. कलाकारांचा सन्मान हा महानगरपालिकेचाही सन्मान असतो. कला साधनेची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली होती. याबाबत तूर्तास पुरस्काराची रक्कम देणे शक्य नसले तरी मानपत्र देऊन पुरस्कारार्थींचा गौरव केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे कलाकारांना कामाची पावती मिळू शकेल, अशा भावना मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘महापालिका पुरस्कारांसंदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या लढ्याला यश मिळाले आहे. कलाकारांसाठी रक्कम नव्हे तर सन्मान महत्त्वाचा असतो. सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. राज्यातील इतर महापालिकांनीही अशा स्वरूपाचा निर्णय घ्यावा.’
सुनील महाजन म्हणाले, ‘रकमेच्या स्वरूपातच सत्कार होणे महत्त्वाचे नसते. पुरस्कार हा कलाकाराने आयुष्यभर केलेल्या कामाची पावती असते. पुरस्काराच्या माध्यमातून महानगरपालिका कलाकाराच्या कार्यकर्तृत्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करते. त्यामुळे पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. यातून कलाकारांच्या जीवनकार्याचा सन्मान होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पुरस्कारांची रक्कम सुरू करणे शक्य नसले तरी याबाबत महानगरपालिका इतर कामे, जाहिरातींवरील उधळपट्टी रोखून पुरस्कार देऊ शकते. यासाठी
नाट्य परिषद, साहित्य परिषद आणि चित्रपट महामंडळ नक्कीच
पाठिंबा देईल.’
येत्या २६ जूनला बालगंधर्व पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे रक्कम सुरू करणे शक्य नाही. मात्र, मानपत्र देऊन कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने कलाकारांबद्दल कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त केली जाईल.
- मुक्ता टिळक, महापौैर
महापालिकेच्या निर्णयामुळे कलाकारांना नक्कीच आनंद झाला आहे. कलेच्या साधनेसाठी कलाकार अविरत मेहनत घेत असतात. लौैकिकार्थाने त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. मात्र, पुरस्कारांच्या रूपाने त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जाते. आबा बागुल यांनी केलेला पाठपुरावा आणि ‘लोकमत’च्या लढ्याला यानिमित्ताने यश मिळाले आहे.
- शमा भाटे, ज्येष्ठ नृत्यांगना