आता संचारबंदी नाही तर जमाव बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:36+5:302020-12-27T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला आहे. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला आहे. आता रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवा तसेच वस्तू यांना यातून सवलत देण्यात आली आहे.
सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शुक्रवारी (दि. २५) रात्री याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार ५ जानेवारीपर्यंत दररोज रात्री २३ ते दुसरे दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यात ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येणे व फिरणे याला मनाई करण्यात आली आहे. याआधी २२ डिसेंबरला काढलेल्या आदेशात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारास मनाई करण्यात आली होती. त्यात बदल करुन लोकांना जमावाने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्यात महापालिका क्षेत्रात २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्याविरोधात हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. ‘कोरोना काय फक्त रात्रीच फिरतो का,’ यापासून अनेक प्रकारे या निर्णयावर टीका झाली. २५ डिसेंबरला लागून सलग सुट्ट्या आल्या आहेत. तसेच ३१ डिसेंबर रोजी नागरिक मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंगसाठी बाहेर पडतात. मात्र, रात्री ११ पासून संचारबंदी लागू केल्याने लोकांचा विरस झाला होता. हॉटेल व्यवसायावरही विपरित परिणाम होण्याची भीती होती. यांना आता दिलासा मिळणार आहे.
चौकट
पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे पुणेकरांबरोबरच सर्वांना दिलासा मिळाला आहे. आता रात्री संचारबंदी नसून लोकांना बाहेर फिरता येईल. बाहेरगावाहून प्रवास करुन आल्यावर रात्री त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय घरी जाता येईल. पहाटे लवकर ज्यांना घरातून बाहेर पडायचे आहे, त्यांना कोणतीही आडकाठी येणार नाही. या आदेशानुसार आता फक्त रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत तुम्हाला ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येता येणार नाही तसेच फिरता येणार नाही.