ठाकरे-पवार सरकारवर आता विश्वास राहिला नाही : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:40+5:302020-12-25T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे (इडब्ल्यूएस)आरक्षण घेतले, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) हक्काचे आरक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे (इडब्ल्यूएस)आरक्षण घेतले, तर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याचे सरकारी वकिलांनीच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणते पाऊल उचलणार आहे? येत्या २५ जानेवारीला न्यायालयात जी अंतिम सुनावणी होणार आहे. सरकारची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न पडला आहे. सरकार हतबल झाल्याचीच शंका आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही,” अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला ‘इडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. २४) छत्रपती संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दि. २५ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीत मला गडबड होईल असे वाटू लागले आहे. आजवर मी नेहमी राज्य सरकारची बाजू घेत होतो. सरकारच्या बाबतीत सकारात्मक होतो. मात्र, यात काही धोका झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार राहणार आहे.”
ज्यांना कोणाला आरक्षण घ्यायचे असेल, ते न्यायालयात जातील आणि आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण घेतील, असे सरकारी वकिलांनीच मला सांगितले, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, की राज्य सरकारने हे धोरण राबवू नये. जर यात काही घोटाळा झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार असेल. कारण, त्यांच्याच वकिलाने त्यांना दिलेला हा सल्ला आहे.
‘सारथी’ हे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. मराठा समाजासाठी असणाऱ्या या संस्थेची अवस्था काय झाली आहे? मला समजत नाही, नेमके काय सुरू आहे? सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ‘इडब्ल्यूएस’च्या बाबतीत मी सांगितलेले सरकारला पटले. मात्र, एकदमच त्यांनी हा विषय काढला, त्यामध्ये त्यांचे काय गणित आहे, हे मला समजेना,” असेही त्यांनी नमूद केले.
-----------------
आंदोलन व्यर्थ जाणार का?
“मराठा समाजातील सर्वजण १० टक्क्यात किती बसतात याचा अभ्यास करावा, किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचाही अभ्यास करावा. ‘एसइबीसी’चे स्वतंत्र आरक्षण होते आणि हे आरक्षण पूर्ण वेगळे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. ४८ लोकांनी बलिदान दिले. घरदार सोडून अनेकजणांनी १९६७ पासून लढा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. हे सगळे व्यर्थ जाणार आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे.”
-खासदार छत्रपती संभाजीराजे