यापुढे निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगायची गरज नाही: शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 07:08 PM2023-10-01T19:08:32+5:302023-10-01T19:10:12+5:30
जुन्नर येथून पुणेकडे जाताना पवार यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मंचर:सत्ता येथे जाते सत्तेला चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात. ज्यांनी निवडून दिलं त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे यापुढे निवडणूक आली तर जनता काय करेल ते सांगायची गरज नाही. अशी टिप्पणी खासदार शरद पवार यांनी केली.
जुन्नर येथून पुणेकडे जाताना पवार यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.ते म्हणाले आंबेगाव तालुक्यात मी यावे म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता.अनेक वर्ष राजकारणात असताना लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने राज्यात वेगळे राजकारण झाले. सत्ता येथे जाते, त्या सत्तेला चिकटून राहायचे नसते.तुम्ही चिकटून राहण्याची भूमिका घेतली तर लोक निकाल लावतात असे सांगून पवार म्हणाले महाराष्ट्रात आता वेगळे राजकारण झाले आहे. ज्यांची तुम्ही मते घेतली ज्यांनी तुम्हाला निवडून दिले त्या जनतेचा तुम्ही विचार केला नाही. ही जनतेची फसवणूक आहे. लोकांना संधी मिळेल त्यावेळेस ते योग्य निकाल लावतील. वर्ष दीड वर्षात निवडणुका होणार असून त्यावेळेस संधी मिळाल्यानंतर तुम्ही काय कराल ते सांगायची गरज नाही असा टोला पवार यांनी लगावला. आंबेगाव तालुक्यात जाहीर सभा घेणार असून त्यावेळी सविस्तर बोलू असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम आदी होते. निकम यांनी प्रास्ताविक करताना जुन्नर येथील कार्यक्रमात पवार यांना विनंती केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतल्याबद्दल आभार मानले. बाजार समितीच्या वतीने सभापती वसंतराव भालेराव, संचालक निलेश थोरात, लक्ष्मण बाणखेले, राजेंद्र भंडारी, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, सुहास बाणखेले, बाजीराव मोरडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर, दत्ता थोरात ,सुरेश आण्णा निघोट ,बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, आदींनी स्वागत केले.
पूर्वनियोजित कार्यक्रम नसतानाही दुपारी उशिरा शरद पवार येणार असल्याचे समजूनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी झालेली रेटा-रेटी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. विशेष म्हणजे शरद पवार गटाबरोबरच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ते स्वागतासाठी हजर होते. गर्दी असूनही पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.